लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात एकत्रित २ लाख ३८ हजार ५४१ जणांचे एकत्रित लसीकरण पूर्ण झाले असून आता येत्या एक मे पासून जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. सद्यस्थितीत आहे ते केंद्र पुरेसे असून केवळ लसीचा पुरवठा अधिक व्हावा, अशी अपेक्षा आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने लसीचा पुरवठा होत आहे. मात्र, हा साठा पुरेसा नसून एका वेळी केवळ तीन ते चार दिवसांसाठीचा साठा जिल्ह्याला मिळत आहे. त्यामुळे जर १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू करायचे झाल्यास मोठ्या प्रमाणार साठा लागणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत केंद्रांपेक्षा लसींच्या पुरवठ्याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या ४२२९९१७ (२०११ च्या जनगणेनुसार)
पुरूष : २१९७३६५
महिला : २०३२५५२
आताची लोकसंख्या : ४७००००० अंदाजे
६० वर्षावरील लोकसंख्या : १० टक्के
१८ ते ४५ वयोगटातील लाेकसंख्या ३५ टक्के
४५ वर्षावरील दीड लाख लसीकरण
जिल्ह्यात ४५ वर्षावरील आतापर्यंत १ लाख ५८ हजार २७१ नागरिकांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. यात १५२६०३ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ५६६८ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के नागरिक हे ६० वर्षावरील असून त्यांचा या लसीकरणात अधिक पुढाकार जाणवत आहे. गेल्या पंधरा दिवसात लस घेणाऱ्यांची संख्या ६० ते ७० हजारांनी वाढली आहे. लसीकरणाचा वेग वाढला असून लस उपलब्ध झाल्यास आणखी हा वेग वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्र पुरेसे
सद्यस्थिती जळगाव जिल्हाभरात सर्व आरोग्र्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र, आयुर्वेद रुग्णालय, खासगी रुग्णालय अशा १३३ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. लसीचा पुरेसा साठा नसल्याने यातील काही केंद्र बंद ठेवावे लागत आहे. १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यासाठी हे केंद्र पुरेसे असून यात वाढ करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशाससनाचे म्हणणे आहे. या केंद्रावरच प्रभावीपणे लसीकरण मोहमी राबविली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.
तीन दिवसांचाच साठालसीकरणासाठी जिल्ह्याला अद्याप मोठ्या प्रमाणात डोसेसची गरज पडणार आहे. सोमवारी १३ हजारांवर डोस प्राप्त झाले आहेत. यात ८ हजार हे कोव्हॅक्सिन तर ५ हजार हे कोविशिल्ड लसीचे डोस आहेत. हा साठा आगामी तीन दिवस जाणार आहे. त्यानंतर पुन्हा डोस प्राप्त होतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजार डोस उपलब्ध झाले होते.