जळगाव : जुने बी.जे.मार्केट परिसरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी मीना दिनेश मल्लारा यांच्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुजराथी गल्ली येथे मीना मल्लारा (५८) या मुलगा व सून यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलाचा व्यवसाय असल्यामुळे ते गुरूवारी सकाळीच कामाला निघून गेले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता मिना व त्यांची सून हे दोघे कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले. त्यावेळी घरात तीन मोलकरीण आणि नात घरात होते. दुपारी काम आटोपून सुनेसह मीना मल्लारा घरी परतल्या. रात्री ८ वाजता त्यांनी घरातील कपाट उघडले असता त्यांना कपाटात ठेवलेले २ लाख ७० हजार रूपयांची रोकड दिसून आली नाही. त्यांनी मुलगा आणि सूनेला विचारणा केली असता त्यांनी आपण पैसे घेतले नसल्याचे सांगितले. अखेर मीना मल्हारा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली व अज्ञात चोरट्याविरूध्द तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.