पाचोरा, (जि. जळगाव) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारे आमचे सरकार हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे सरकार आहे, यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे आमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले.
केंद्राने राज्यातील रखडलेले रस्ते व रेल्वे प्रकल्पांसाठी दोन लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. लोहारी, ता. पाचोरा येथे रविवारी सायंकाळी बडगुजर समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. गेल्या अडीच वर्षांच्या तुलनेत आम्ही सहाच महिन्यांत चांगले काम केले आहे. रस्ते आणि रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागले असल्याचे सांगून केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी यांच्या पाठबळावरच राज्याचा विकास होत आहे. सहा महिन्यांत केंद्राच्या सहकार्याने ३० हजार पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचे शिंदे म्हणाले.