लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. त्यात उमेदवारी आणि मतदानाच्या अधिकारासाठी विकासो आणि इतर संस्था गटातून दोन हजार ३८२ ठराव पाठवण्यात आले आहेत. त्यात प्रमुख संचालकांचेही ठराव विकासोच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहेत. त्यात विविध कार्यकारी सोसायटी गटातून ८६१ जणांचे ठराव पाठवण्यात आले आहेत. तर इतर संस्था गटातून १५२१ ठराव पाठवण्यात आले आहेत.
जिल्हा सहकार विभाग हे ठराव एकत्रित करून नाशिक सहायक संचालकांकडे पाठवणार आहे. त्यानंतर सहायक संचालक त्याला मान्यता देऊन जिल्हा बँकेकडे पाठवतील. त्यातून नंतर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल आणि निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. जिल्हा बँकेची निवडणुक ही सहकार निवडणुक आयोगाच्या सुचनांनुसार चौथ्या किंवा पाचव्या टप्प्यात होऊ शकते. निवडणुकीचा हा टप्पा जुन किंवा जुलैमध्ये येऊ शकतो.
विकासो गटात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, मनूर आणि बोदवड, माजी मंत्री एकनाथ खडसे, कोथळी, ता मुक्ताईनगर, खासदार उन्मेष पाटील, दरेगाव, आमदार सुरेश भोळे, कडगाव, ता. जळगाव, माजी आमदार चिमणराव पाटील अंबापिंप्री, माजी खासदार वसंतराव मोरे मेहू-टेहू, अमोल पाटील, एरंडोल तालुका,माजी संचालक सोनल पवार,चोरगाव, संजय पवार यांचा ठराव चांदसरमधून, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील धारागीर, डॉ. सुरेश पाटील चहार्डी, ता. चोपडा, माजी आमदार स्मिता वाघ, मालपूर- धार आणि डांगर ता. अमळनेर, माजी महापौर विष्णु भंगाळे सुनसगाव ता. जामनेर येथून ठराव पाठवण्यात आला आहे.
इतर संस्था गटातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा ठराव दापोरा दुध उत्पादक संस्थेतून पाठवण्यात आला आहे. माजी संचालिका संगीता भंगाळे यांचा युवा विकास फाऊंडेशन मधून पाठवण्यात आला आहे.
बँकेच्या २१ संचालकांसाठी विविध कार्यकारी सोसायटीतून १५, इतर संस्था गटातून एक, दोन महिला, एक ओबीसी, एक एस.सी., एस.टी. आणि एक एन.टी असे संचालक निवडले जातात.