जळगाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अनेक प्रमुख डॉक्टर कोरेाना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर शिवाय कोविडचे रुग्ण वाढत असताना या ठिकाणी मनुष्यबळाचे मोठे संकट निर्माण झाले होते; मात्र याची वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दखल घेत, बाहेरील जिल्ह्यातील २० डॉक्टरांची जळगावात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबत तातडीचे आदेश काढले आहेत.
कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व आवश्यक उपचार व व्यवस्थापनेकरिता या डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्यात येत असल्याचे डॉ. लहाने यांनी म्हटले आहे. हे डॉक्टर ज्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत, त्या ठिकाणाहून त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे व या डॉक्टरांनी तातडीने जळगावात रुजू व्हावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
असे आहेत डॉक्टर
नागपूर येथील : स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष झरारिया, औषधवैद्यक शास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र सहयोगी प्राध्यापक डॉ. पंकज ताठे, बधिरीकरणशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ.विजय पाटील, बालरोगचिकित्साशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. बापू येलम, औषधवैद्यकशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. जितेंद्र भगत, शरीररचनाशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. भरत ठाकरे, शरीरक्रियाशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ.अक्षय बेरड, जीवरसायनशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. राहूल गडपाल.
औरंगाबाद येथील : स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र सहायोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत भिंगारे, शल्यक्रिया शास्त्र सहयोगी प्राध्यापक डॉ.सय्यद फैयाज अली, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. सुनील पंडागळे.
अंबेजोगाई : नेत्रशल्यचिकित्साशास्त्र सहयोगी प्राध्यापक डॉ. एकनाथ शेळके, बधिरीकरणशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. प्रसाद सुळे, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. किरण पारधी, शल्यक्रियाशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. कौशल कोंडावार, औषधवैद्यकशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. सदानंद कांबळे.
लातूर : बधिरीकरणशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. किरण तोडकरी,
नांदेड : औषधवैद्यकशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. मो. अब्दूल राफे फारूकी मुगनी, औषधवैद्यकशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ. राहूल परसोडे.
मोठी चिंता दूर
२० डॉक्टरांमध्ये भूलतज्ज्ञ व फिजिशियन प्रत्येकी तीन असल्याने रुग्णालयाची चिंता दूर होणार आहे. शिवाय कोविडमधून अनेक डॉक्टर बरेे होत असून, तेही कर्तव्यावर परतणार असल्याने मनुष्यबळाचा मुद्दा बऱ्याच अंशी निकाली निघणार आहे. या डॉक्टरांना तातडीने नियुक्तीचे आदेश आहेत.