जळगाव : शासकीय महिला रुग्णालय मोहाडी, इकरा कोविड सेंटर, शासकीय रुग्णालय भुसावळ व पाळधी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने २० ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर बसविण्यात आले असून ते रुग्णसेवेत दाखल आहे.
सद्य:स्थितीमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. कृत्रिम ऑक्सिजन सिलिंडरची क्षमता ७ किलो असते. सिलिंडर रिकामे झाल्यावर ते बदलताना त्यात जवळजवळ २० ते ३० टक्के ऑक्सिजन शिल्लक राहतो. परिणामी, तेवढा प्राणवायू वाया जातो. याकरिता ड्युरा सिलिंडर हा उत्तम पर्याय असून यामुळे ड्युरा सिलिंडर बदलविण्याची खास सुविधा असल्याने ऑक्सिजन पुरवठा खंडित न करता प्राणवायूचा अपव्यय टाळता येणे सहज शक्य झाले आहे.
६०० जम्बो सिलिंडरमध्ये जितका ऑक्सिजनचा साठा असतो तेवढा साठा २० ड्युरा सिलिंडरमध्ये आहे. रेडक्रॉसने खरेदी केलेल्या २० ड्युरा सिलिंडरपैकी ६ ड्युरा सिलिंडर हे शासकीय महिला रुग्णालय मोहाडी, ६ ड्युरा सिलिंडर इकरा कोविड सेंटर, शासकीय रुग्णालय भुसावळ व पाळधी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अनुक्रमे ४ व २ ड्युरा सिलिंडर बसविण्यात आले असून त्या माध्यमातून ज्या रुग्णांना प्राणवायूची गरज आहे त्यांना अखंडितपणे प्राणवायूचा पुरवठा सुरू आहे. दोन ड्युरा सिलिंडर आपत्कालासाठी स्टॅन्ड बाय ठेवण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या संकल्पनेनुसार उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकारिणीने निर्णय घेऊन २० ड्युरा सिलिंडर उपलब्ध करून दिले.