भूषण श्रीखंडे, जळगाव : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष, आणि ढोल ताशाच्या गजरात शुक्रवारी ‘श्री’ गणरायाला मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. जळगाव शहरात शुक्रवारी सकाळी दहा वाजता जळगाव महापालिकेच्या मानाच्या गणपतीची पुजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत ७२ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. विस तास चाललेल्या मिरवणुकीत गणेश भक्तांचा प्रचंड उत्साह तर लाखो भाविकांची अलोट गर्दी मिरवणूक बघण्यासाठी झाली होती. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
गेल्या दहा दिवसापासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवारी गणेश विसर्जनासाठी सकाळ पासून गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. घरगुती गणपतीचे सकाळ पासून मेहरुण तलाव येथे विसर्जन केले जात होते. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी दहा वाजता महापालिकेच्या मानाच्या गणपती पासून सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरवात झाली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी जिल्हा पोलिस दलाने चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.
जिल्हाधिका-यांनी वाजविला ढोल, आयुक्त, आमदारांनी धरला ठेका
मनपाच्या मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल हाती घेऊन वाजविला. यावेळी आमदार सुरेश भोळे व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेका धरून विसर्जन मिरवणुकीत आनंद साजरा केला.
मानाच्या गणपतीला अग्निशमन विभागाने दिली सलामी
जळगाव शहरात प्रथमच विसर्जन मिरवणुकीत मनपाचा मानाचा गणपतीला आगळ्या वेगळ्या पद्धतीने सलामी देण्यात आली. दुपारी एक वाजता टॉवर चौकात गणपती आल्यावर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबाद्वारे पाण्याची फवारणी करून सलामी दिली. यावेळी आयुक्तांसह सर्व कर्मचाऱ्यांनी नृत्य केले.