डीआरएम यांची माहिती :
कोरोनामुळे जळगाव स्टेशनवरील दादरा सुरू होण्यासाठी विलंब
जळगाव : कोरोना महामारीमुळे विविध क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला. मात्र, या काळात रेल्वेने गेल्या वर्षी मार्चपासून ते यंदा २९ मार्चपर्यंत विक्रमी माल वाहतूक करून चालू आर्थिक वर्षामध्ये २० टक्के अधिक उत्पन्न मिळविले असल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तसेच यावेळी काम पूर्ण झालेला जळगाव स्टेशनवरील दादरा हा कोरोनामुळे सुरू करण्यात आलेला नाही. मात्र, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हा दादराही तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा उपस्थित होते. यापुढे गुप्ता यांनी, भुसावळ विभागातील एकूण सोळा हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम वेगाने सुरू असून, येत्या पंधरवड्यात सर्व कर्मचाऱ्यांना लस देण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तसेच रेल्वे रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटांची संख्या ११० करण्यात आली असून, त्याचप्रमाणे ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा बसविण्याचे कामही रेल्वे रुग्णालयामध्ये सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, सध्या सुरू असलेल्या गाड्यांपैकी काही गाड्या रद्द होणार असल्याची शक्यताही वर्तवली.