डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ६८ हजार डोस प्राप्त होताच गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. मात्र, पूर्ण लसीकरण केंद्राचा विचार केल्यास आगामी चार दिवसांचे हे डोस असून त्यानंतर पुन्हा लस उपलब्धतेवर लसीकरणाची गती अवलंबून राहणार आहे. डोस उपलब्ध होत नसल्याने मध्यंतरी कासवगतीने हे लसीकण सुरू होते. आता केंद्र वाढून १६८ केंद्र करण्यात आले आहेत.
१ मे पासून १८ ते ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून त्यात ४५ वर्षावरील नागरिकांची दुसऱ्या डोससाठी धावाधाव सुरू झाली आहे. त्यामुळे केंद्रांवर अधिकच गर्दी वाढली आहे.
१८ ते ४५ वयोगटासाठी ८ केंद्र
१८ ते ४५ वयोगटासाठी जिल्हाभरात ८ केंद्र आहेत. यात शहरातील शाहू महाराज रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, रोटरी भवन, रेडक्रॉस अशी केंद्र आहेत. तर शाहू महाराज रुग्णालयात तसेच चेतनदास मेहता, डी. बी. जैन रुग्णालयात या ठिकाणी ४५ वर्षावरील नागरिकांचा दुसरा डोस देण्यात येत आहेत. यासह १८ ते ४५ वयोगटासाठी मुक्ताईनगर, भुसावळ, नशिराबाद या ठिकाणीही लसीकरण केले जात आहे. या केंद्रांवर गुरुवारी १५०६ नागरिकांनी पहिला डोस घेतला. मात्र, या वेगवेगळ्या केंद्रामुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या आहे.
सकाळी सहा वाजेपासून रांगा
बुधवारी सायंकाळी लस प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून केंद्रावर गर्दी झालेली होती. अगदी यात्रेचे स्वरूप या केंद्राना आले होते. मात्र, सकाळी सहापासून जरी गर्दी असली तरी काही केंद्रांवर साडे दहा वाजेपासून कूपन वाटप करुन सुरूवात करण्यात आली होती. अनेकांना आठ-आठ तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले होते. गुरुवारी पहाटे हे गंभीर चित्र होते.
आरोग्य कर्मचारी
पहिला डोस : २४५०१, दुसरा डोस : १३६२४
फ्रंट लाईन वर्कर
पहिला डोस : ३०९०७, दुसरा डोस : १०७५३
४५ वर्षावरील नागरिक : पहिला डोस : २०९१७५, दुसरा डोस : ३७२४४
१८ ते ४५ वर्ष नागरिक
पहिला डोस ६६८५
सकाळी सहापासून आम्ही लसीचा दुसरा डोस घ्यायला आलेलो होतो. मात्र, नियोजन नसल्याने ज्येष्ठांचे प्रचंड हाल झाले. साडे दहा वाजेपासून कूपन वाटायला सुरुवात झाली. दुपारी आम्हाला लस मिळाली. मात्र, या वेळेत प्रचंड त्रास झाला. मे महिन्याच्या उन्हात अधिक त्रास ज्येष्ठांना सहन करावा लागला. प्रचंड गर्दी झालेली होती.
- नंदकिशोर उपाध्याय
लस घ्यायला आठ ते साठे आठ तास लागले. ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. ज्यांना सहन होत नव्हते ते खालीच बसून होते. सकाळी लवकर प्रक्रिया सुरू व्हावी, जेणे करून ज्येष्ठ नागरिकांना या उन्हाचा त्रास होणार नाही.
- सोपान नारखडे