लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ७\१२ चे संगणकीकरण व ई-फेरफार कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील एकूण १८० तलाठी आणि ३० मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळणार आहे. या आधीही तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप देण्यात आले होते. मात्र, शासन नियमाप्रमाणे एका लॅपटॉपची मुदत ही पाच वर्षे असते. त्यानंतर हे लॅपटॉप मुदतबाह्य गणले जातात. त्यानंतर पुन्हा नवीन लॅपटॉप देण्यात येतात. त्यानुसार आता जिल्ह्यातील एकूण २१० तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना नवे लॅपटॉप देण्यात येणार आहेत.
शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी ३१ मार्च रोजी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात डिजिटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड मॉर्डनायजेशन कार्यक्रमांतर्गत जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख , पुणे यांच्या कार्यालयाकडून ई फेरफारच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या लॅपटॉपची क्लाऊड सर्व्हरसोबत जोडणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये लॅपटॉप खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे.
तालुकानिहाय नवीन लॅपटॉपची मागणी
तालुका - तलाठी मंडळ अधिकारी
जळगाव १२ २
जामनेर १२ २
एरंडोल १२ २
धरणगाव १२ २
पारोळा १२ २
भुसावळ १२ २
मुक्ताईनगर १२ २
बोदवड १२ २
यावल १२ २
रावेर १२ २
पाचोरा १२ २
भडगाव १२ २
चाळीसगाव १२ २
अमळनेर १२ २
चोपडा १२ २
एकूण १८० ३०
एकूण मंडळ अधिकारी - ८६
नवे लॅपटॉप मिळणारे मंडळ अधिकारी - ३०
एकूण तलाठी ५०१
नवे लॅपटॉप मिळणारे तलाठी १८
६६ प्रिंटरचीही होणार खरेदी
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ५५ तलाठी आणि ११ मंडळ अधिकारी यांच्यासाठी जिल्हा प्रशासन ६६ प्रिंटरची खरेदीदेखील करणार आहे. नागरिकांना लागणाऱ्या विविध उताऱ्यांसाठी या प्रिंटरचा उपयोग होतो. जिल्ह्यात आता तलाठी आणि मंडळ अधिकारी अद्ययावत होणार आहे. प्रत्येक तालुक्यात आता प्रत्येकी १२ तलाठी आणि दोन मंडळ अधिकाऱ्यांना नवे लॅपटॉप मिळणार आहेत.
पूर्वीच्या लॅपटॉपचे काय ?
याआधी देखील जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप देण्यात आले होते. मात्र, त्यातील २१० जणांचे लॅपटॉप हे कालबाह्य झाले आहेत. पाच वर्षांत होणारे तांत्रिक बदल आणि अद्ययावत होत असलेली यंत्रणा पाहता आता या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हे लॅपटॉप दिले जाणार आहेत.