लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमधील इयत्ता दहावीचे २१६५ विद्यार्थी विना परीक्षा पास होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. बाधितांसोबतचं मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शासनाकडून राज्यात कडक निर्बंध घालून देण्यात आले आहेत. मागील वर्षापासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मध्यंतरी काही दिवस शाळा उघडल्या होत्या. पण, कोरोनामुळे पुन्हा बंद झाल्या. त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा होतील की नाही, हा संभ्रम पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये होता. बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. आता त्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातच सीबीएसईने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील सीबीएसईच्या ३५ शाळांमधील २१६५ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यात १३३४ मुले आहेतर ८९१ मुलींचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने योग्य निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.
===============
महिनाभरात होईल स्पष्ट
सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. मात्र, अजून बोर्डाच्या परीक्षांबाबत संभ्रम निमार्ण आहे. दुसरीकडे अकरावी, आयटीआय तसेच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाबाबत अद्याप कुठल्याही मार्गदर्शक सूचना शासनाकडून आलेल्या नाहीत. महिनाभरात या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्ट होणार असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.
===============
गुणदान पध्दत वेगवेगळी
सीबीएसईने दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली असून बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजेच राज्य मंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. प्रत्येक बोर्डाची गुणदान पद्धत वेगवेगळी असल्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा ठेवल्यास सर्व विद्यार्थ्यांना समपातळीवर आणता येईल. गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी तयार करणे हे दहावी-बारावीचे ध्येय बनून गेले आहे. कोरोनाच्या निमित्ताने त्यातून मोकळे होण्याची संधी आहे. कारण दहावी-बारावी
हे सर्टिफिकेट कोर्स आहेत हे विसरायला नको. त्यातच सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी उत्तीर्णतेबाबतीत काही निकष तयार होतील, अशी शक्यता आहे.
- डॉ. जगदीश पाटील, शिक्षणतज्ज्ञ
========
- एकूण विद्यार्थी : २१६५
- मुले : १३३४
- मुली : ८९१
========
सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कोरोनाच्या काळात ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा झाल्या असत्या, तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आधीच शाळांकडून देखील विद्यार्थ्यांची परीक्षेबाबत संपूर्ण तयारी करून घेण्यात आली होती.
- डॉ. राहुल पाटील, पालक
========
अतिशय योग्य निर्णय आहे. आता मात्र विद्यार्थ्यांना गुणदान कसे केले जातील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शाळेकडून पूर्व परीक्षा घेतली गेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला होता. जर सीबीएसईने परीक्षा घेतली असती, तर ते चालले असते. पण सद्याची परिस्थिती पाहता, मुलांचा जीव धोक्यात टाकणे योग्य नाही.
- विभावरी जोशी, पालक
=======
दहावीची परीक्षा घेणे आवश्यक असले तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण,असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे.
- संदीप पाटील, पालक