लोकमत न्युज नेटवर्क
कुऱ्हाड ता. पाचोरा : कुऱ्हाड बुद्रूक ता. पाचोरा येथे कोराेनामुळे दहा दिवसांत १० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये झळकताच ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. रविवार सायंकाळपासूनच अतिगंभीर व सौम्य लक्षणे असलेल्या लोकांच्या रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. यात २२ जण बाधित आढळून आले आहेत.
बाधितांमध्ये कुऱ्हाड बुद्रूकसह तांड्यातील ग्रामस्थांचा समावेश आहे. त्यातील काहींना जळगाव व काहींना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच गावात हायड्रोक्लोराइडची फवारणी करण्यात आली.
सोमवारी रॅपिड चाचणी कॅम्प लावण्यात आला होता. यासाठी अनेक लोकांनी स्वतःहून सहभाग नोंदविला. या वेळी ग्रामसेवक विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, दीपक पाटील, गोपाळ पाटील, सुभाष राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र पाटील, आरोग्य सेवक व आशा सेविका आदी परिश्रम घेत आहेत.
पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चवडे, पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी कुऱ्हाड खुर्द व बुद्रूक या दोन्ही गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी दुपारी तातडीने लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य विभागाची बैठक घेत सूचना दिल्या.
ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील व पवन पाटील यांनी गावात स्वखर्चाने लोकांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले. गावात अजूनही लोकांच्या मनात भीती कायम आहे. आता ८० टक्के गाव शेतात वास्तव्याला गेल्याची माहिती मिळाली.