जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गासोबत ऑक्सिजनचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याच्या पुरवठ्यात अडथळे येत आहे. यावर मात करण्यासाठी व अखंडित ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जिल्ह्यात २२ ड्युरा सिलिंडर उपलब्ध झाले असून यातील प्रत्येकी सहा सिलिंडर मोहाडी येथील महिला रुग्णालय व इकरा कोविड केअर सेंटरमध्ये बसविण्यात आले आहेत. यामुळे मोहाडी महिला रुग्णालयातील ऑक्सिजनचा प्रश्नदेखील मार्गी लागला आहे. भुसावळ व चोपडा येथेही प्रत्येकी चार ड्युरा सिलिंडर बसविले जाणार असून दोन सिलिंडर पाळधी येथे बसविण्यात आले आहेत.
दोन महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून यात मृत्यूदेखील अधिक होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने त्या वेळीही ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्या वेळच्या तुलनेत या वर्षी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व त्यांना ऑक्सिजनचीही अधिक गरज भासत असल्याने हा प्रश्न यंदा प्रकर्षाने जाणवत आहे.
यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक असण्यासोबतच आता ऑक्सिजन पुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व इंडियन रेडक्रॉस सोसायटीने पुढाकार घेत सोसायटीच्यावतीने जिल्ह्यासाठी आतापर्यंत २२ ड्युरा सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे.
मोहाडी रुग्णालय सज्ज
कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मोहाडी रस्त्यावरील महिला रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देण्यासह व्हेेंटिलेटरची सोय करण्यात आली. मात्र ऑक्सिजनची उपलब्धता नसल्याने व्हेंटिलेटर सुरू करता येत नव्हते. त्यात आता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या रुग्णालयात सहा ड्युरा सिलिंडर बसविण्यात आले असून ते रुग्णसेवेतही दाखल झाले आहे. त्यामुळे आता हे रुग्णालय सज्ज झाले असल्याचे सुखद चित्र आहे.
मोहाडी रस्त्यावरील महिला रुग्णालयात हे ड्युरा सिलिंडर बसविण्यापूर्वी इकरा कोविड केअर सेंटरमध्येदेखील सहा ड्युरा सिलिंडर बसविण्यात आले असून पाळधी येथे दोन सिलिंडर बसविले आहे. या सोबतच आलेल्या एकूण २२ ड्युरा सिलिंडरमधून प्रत्येकी चार सिलिंडर चोपडा व भुसावळ येथे बसविण्यात येणार आहे. या शिवाय आणखी २० ड्युरा सिलिंडर जिल्ह्यासाठी येणार आहे.
जेवढा वापर तेवढे ‘स्टॅण्डबाय’ सिलिंडर
ड्युरा सिलिंडर बसवितानाच अशा प्रकारे बसविले जातात की जेवढ्या सिलिंडरमधून पुुरवठा सुरू असेल तेवढे सिलिंडर तेथे अतिरिक्त (‘स्टॅण्डबाय’ ) असतात. यात मोहाडी रुग्णालय व इकरा केंद्रात बसविलेल्या सहा सिलिंडरपैकी तीन सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असतो व उर्वरित तीन सिलिंडर अतिरिक्त असतात. पहिले तीन सिलिंडर रिकामे झाले की लगेच दुसऱ्या तीन सिलिंडरद्वारे पुरवठा सुरू होतो व रिकामे झालेले सिलिंडर रिफलिंग केले जातात.
शुद्धतेसह बचतही
ड्युरा सिलिंडरचे वैशिष्ट्ये म्हणजे हे सिलिंडर पूर्णत: स्टीलचे असून यात लिक्विड ऑक्सिजन भरल्यानंतर ते वेपोरायझर, रेग्युलेटरद्वारे ऑक्सिजन पाईपद्वारे पुरविले जाते. त्यामुळे याची शुद्धता ९९.९९ टक्के असून साधे सिलिंडर बदलविताना वाया जाणाऱ्या ऑक्सिजनचीही या ड्युरा सिलिंडरमुळे बचत होते. मोठ्या शहरांमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात असणारे हे ड्युरा सिलिंडर कोरोना काळात जळगावात ५५ ते ६० लाख रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे आता अखंडित ऑक्सिजन पुरवठ्याने मोठा आधार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.