चाळीसगाव : मे महिन्याच्या सुट्यांमध्ये शाळेत खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले. जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये खिचडी शिजवली जाईल. मुख्याध्यापकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांमध्ये सुट्टीतही शाळेत यावे लागणार असल्याने नाराजीचा सुर आहे.राज्यात दुष्काळाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये मुलांना मे महिन्याच्या सुट्टीत खिचडी शिजवून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे. शासनाने परिपत्रक जारी केले आहे. ४ तारखेपासून प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागली. सुट्या १६ जून अखेर असतील. सुट्टीच्या कालावधीतही मुलांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासनाचा उद्देश चांगला असला तरी, मे महिन्यात मुले शाळेत येत नाही. पालकांना समज देऊनही मुले शाळेत पाठवित नाहीत. त्यामुळे योजनेला हरताळ फासण्याची शक्यताच अधिक आहे. पोषण आहार शिजवून तो वाया गेल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ज्या भागात मुलांना दुष्काळात अन्न उपलब्ध होत नाही. तिथेच पोषण आहार देणे योग्य होईल. पोषण आहार शिजवण्यासह वाटपाचे नियोजन मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे. उपशिक्षकांना कामे देण्यात यावी.महिनावर नियोजनात प्रत्येक दिवशी शिक्षकांची ड्युटी असेल. संबंधित शिक्षकाने शाळेत सकाळी सात वाजता उपस्थित राहून विद्यार्थीसंख्येनुसार बचत गटांकडून पोषण आहार शिजवायचा आहे. सकाळी ९ ते १० अशी वेळ आहे.
जिल्ह्यातील २२०० शाळांमध्ये सुटीतही शिजणार खिचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 4:33 PM