जळगाव : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून शनिवारी पुन्हा चार बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरात नवे २३२ रुग्ण आढळून आले आहेत, तर २५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीणमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढत असून शनिवारी ग्रामीणमध्ये २६ नवे बाधित आढळून आले आहेत.
जळगाव तालुक्यातील मृतांची संख्या ४८९ वर पोहोचली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या २७६५ वर पोहोचली आहे. जळगाव शहरात बाधितांचे प्रमाण कमी होत असले तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण मात्र, वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा विचार केला असता पूर्ण जिल्हाभरात ही संख्या रोज वाढत आहे. यात अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची संख्या ५३० वर पोहोचली आहे. शनिवारी आरटीपीसीआर तपासणीचे १३८० अहवाल समोर आले. यात ३४६ बाधित आढळून आले असून ५३४७ अँटिजन चाचण्या झाल्या. यात ७४८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ६२० अहवाल प्रलंबित आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका दिवसात १० मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान, रुग्ण उशिरा दाखल होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, बेड मॅनेजमेंट व वॉर रूमला बेड उपलब्धतेबाबतचे कॉल कमी झाले असून आपात्कालीन विभागातील वेटिंग कमी झाल्याचे चित्र आहे. रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने काहीसे स्थिर वातावरण असल्याचे सांगण्यात आले.