लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बेड मॅनेजमेंटसह आयसीयूमधील गंभीर रुग्णांच्या प्रकृतीचे अपडेट ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २४ शिक्षकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री दहा अशा वेगेवेळ्या सत्रात वेगवेगळ्या शिक्षकांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी याबाबत आदेश काढले आहेत.
रुग्णांची होणारी गैरसोय, डॉक्टरांना तातडीची माहिती देणे, बेड मॅनेजमेंट मुद्दा सोडविणे यात डॉक्टर किंवा पॅरामेडीकल स्टाफ अडकून ठेवणे सद्यस्थिती प्रशासकीय यंत्रणेला परवडणारे नाहीत, त्यामुळे या कामांसाठी आता शिक्षकांची मदत घेतली जात आहेत. यात बारा शिक्षक हे जीएमसी साठी तर बारा शिक्षक हे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयासाठी नियुक्त करण्र्यात आले असून संबधित नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामे करण्याच्या सूचना त्यांना देण्र्यात आल्या आहेत. २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत या नियुक्त्या देण्यात आल्या असून त्या कोणत्याही परिस्थती रद्द करण्यात येणार नाही, शिवाय या काळात कोणतीही रजा किंवा सुटी घेता येणार नसून अपवादात्मक परिस्थित सुटीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
या आहेत जबाबदाऱ्या
रुग्णालयात दाखल होणा्या रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था पाहणे, रुग्णांना जास्त वेळ ॲडमीशन शिवाय बसावे लागू नये म्हणून त्यांना तात्काळ दाखल करून घेण्याबाबत नियोजन करणे, दाखल रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळतील, नातेवाईकांची गर्दी होणार नाही., याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून उपाययोजना करणे, आयसीयूमध्ये दाखल रुग्णांवर पॅरामेडिकल स्टाफच्या सहाय्याने लक्ष ठेवणे, व्हिडीओ कॉलद्वारे संबधित रुग्णाचे स्टाफच्या सहाय्याने ऑक्सिजन, तापमान मोजणे, किमान एक वेळा प्रत्यक्ष जावून याची पाहणी करणे, अशा प्रमुख जबाबदाऱ्या या शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या आहेत.
या शिक्षकांची नियुक्ती
पंकज अंभोरे, जगजितसिंग कचवे, राजेंद्र आंबटकर, अशोक बावस्कर, बालचंद खाटपाल, पठाण वसीम खान, असीनखान, सुधाकर गायकवाड, शाह फैज इक्बाल, गौरव भोळे, भरत चौधरी, किशोर जाधव, डी. व्ही. चौधरी, डी. एन. पाटील, रामकृष्ण पाटील, सुनील ताडे, दीपक कुलकर्णी, संजय कढोले, वाय. के. चौधरी, साबीर अहमद, आर. एल. पाचपांडे, शेख फारूख यांचा समावेश आहे.