लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : नशिराबाद ते जळगाव दरम्यान महामार्गाला लागून असलेल्या २५ एकर शेतात पावसाचे पाणी साचले असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात मुख्य नाल्याचा प्रवाह बदलवून १०० फूट लांब नव्याने नाल्याची आखणी केल्यामुळे परिसरातील शेतांमध्ये हे पाणी साचले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पिकांचे नुकसान होण्यासह या पाण्यामुळे महामार्गाचा काही भागदेखील खचला असून यामुळे वाहतुकीलादेखील धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
जळगावकडे जाताना महामार्गावर नशिराबादजवळ नाला ज्या दिशेने वाहत होता त्याच्या प्रवाहाची दिशा बदलून १०० फूट लांब नवीन नाल्याची आखणी केल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये सोमवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे २५ एकर शेतात पाणी साचले असून महामार्गाचा भागही खचला आहे.
पिकांसाठी प्रतीक्षा असलेल्या पावसानेच होत्याचे केले नव्हते
गेल्या दोन वर्षांपासून अतिपावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यात यंदा पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यात सोमवारी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पिकाला जीवदान मिळण्याची अपेक्षा असताना याच पाण्याने होत्याचे नव्हते केल्याने सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या शेतकऱ्यांना बसला फटका
राजू रेहदासनी, प्रल्हाद पाटील, रमणलाल भावसार, मधुकर खुंटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. यामुळे शेतामधील सोयाबीन, उडीद व इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाहतुकीला धोका
राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने काम करताना नाल्याची दिशा बदलल्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्यासह महामार्गाच्या कामालादेखील बसत आहे. पाण्यामुळे आता केवळ काही भाग खचला असून याहीपेक्षा जास्त व सलग पाऊस झाल्यास महामार्गावर पाणी येण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्यामुळे वाहतुकीलादेखील धोका निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी खचलेला रस्ता न दिसल्यास अपघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.
खचलेल्या रस्त्याची तसेच शेतातील नुकसानीची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष जनार्दन माळी, विनायक धर्माधिकारी यांनी पाहणी केली. या वेळी शेतकरी उपस्थित होते.
नुकसान भरपाई द्या पंचनामे करायामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून नाल्याचा प्रवाह बदलल्यानेच हे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पेरणी व यंदाचा हंगाम हातातून गेला. महामार्ग प्राधिकरण विभागाने तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उपाध्यक्ष लालचंद पाटील व शेतकऱ्यांनी केली आहे.
‘लोकमत’ने या पूर्वीच वर्तविला होता अंदाज
महामार्गाचे काम पाहता ‘महामार्गावर पाणी तुंबण्याचा धोका?’ या मथळ्याखाली लोकमतने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. तसेच भविष्यात शेतकऱ्यांना याचा त्रास सहन होईल, अशी ओरड शेतकरी अगोदर पासूनच करीत होते, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष झाले व पहिल्याच दमदार पावसात शेतात पाणी साचण्यासह महामार्गाचेही नुकसान झाले आहे.
नाला कसा वळविला त्याचा आराखडा कसा मंजूर केला हे पहावे लागेल. तसेच स्थानिक अधिकार्यांना त्याबाबत कळवून पाहणी करणार आहे. : ओंकार चांडक, कार्यकारी अभियंता, न्हाई.