जळगाव : काँग्रेसने सत्तेत असताना गरीबी हटावचा केवळ नारा दिला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात गरीबांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्याचा परिणाम म्हणून २५ कोटी लोक हे दारिद्रय रेषेच्या बाहेर निघाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जळगावात केले.
जळगावातील युवा संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून खान्देशातील तरुणाईला दिशा दाखविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचे स्वप्न पाहिले आहे. त्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करतोय असे सांगितले.
गरीबी हटावचा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पासून आता राहुल गांधी या सा-यांनी केला. मात्र गरीबी कमी झाली नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी २५ कोटी लोकांना दारिद्रयरेषेच्या बाहेर काढले. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे. आगामी चार वर्षात ती तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य आहे. गरीबांचा विकास करून अर्थव्यवस्था मजबूत करता येते हे मोदींनी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.