मुक्ताईनगर : जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या केळी व इतर पीक उत्पादक शेतकरी तसेच घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्त नागिरिकांना नुकसान भरपाई पोटी दोन कोटी २८ लक्ष रुपये निधी मंजूर झाला. याचबरोबर सुळेवाडी, ता.बोदवड येथील वीज पडून ठार झालेल्या महिलेच्या वारसांना देखील चार लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर केल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी तसेच पडझड झालेल्या घरांची पाहणी आमदार पाटील यांनी केली होती. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून २० ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फळ पीक विमा संदर्भात झालेल्या बैठकीच्या दरम्यान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार मंजुरीचे पत्र प्राप्त झाले असून रावेर तालुक्यासाठी १ कोटी १३ लक्ष ३२ हजार ८५५, मुक्ताईनगर तालुक्यासाठी ४१ लाख ३६हजार ९४२ व बोदवड तालुक्यासाठी ७३ लक्ष २७७० रुपये अशी एकूण २ कोटी २८ लक्ष रुपये नुकसान भरपाईपोटी निधी मंजूर झाले.दरम्यान १० सप्टेंबर रोजी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतात काम करणाऱ्या रावेर तालुक्यातील सुरवाडी येथील आशा राजेंद्र महानुभाव या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. महिलेच्या वारसांना नुकसान भरपाईपोटी चार लक्ष रुपये निधी देखील मंजूर झाल्याची माहिती आमदार पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.
अडीच कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 5:46 PM