स्टार ७६४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या संकटात घरोघरी जाऊन सिलिंडर पुरविणाऱ्या डिलिव्हरी बॉय हेच कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित रहात असल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. शहरातील २५० कर्मचाऱ्यांपैकी केवळ १०० जणांना मिळाला असून पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने इतर डिलिव्हरी बॉय लसीकरणापासून वंचित राहत आहे. दरम्यान, या संदर्भात गॅस एजन्सी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची माहिती, आवश्यक कागदपत्रे संकलित केली जाते असून याविषयी पुरवठा विभागाला पत्र देखील देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला व त्यावेळी जाहीर झालेल्या लाॅकडाऊनमध्ये अनेक जण घरीच असल्याने गॅसची मागणी देखील वाढली होती. त्यानंतर यंदा देखील पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आल्याने अनेकांचे घरूनच काम सुरू आहे. या काळात गॅस सिलिंडरची मागणी वाढली. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गॅस सिलिंडर वितरित करणारे कोरोनाची भीती न बाळगता घरोघर जाऊन सिलिंडर पुरवीत आहे.
एक वर्षाहून अधिक काळ झाला असला तरी व सध्या कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असली तरी या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस मिळणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसून लसीच्या तुटवड्यामुळे हे कर्मचारी लसीकरणापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यातील लस उपलब्ध होताच ती तात्काळ संपत असल्याने त्याचा परिणाम या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर होत असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिबंधित क्षेत्र असो अथवा प्रतिबंधित इमारत या प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या वर्षभरापासून डिलिव्हरी बॉय सेवा बजावत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून त्यांच्यासाठी लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देखील या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
दहा टक्के कर्मचारी पॉझिटिव्ह
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला त्यावेळी ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला तेथे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून ते पत्रे अथवा इतर वस्तू लावून परिसर बंद केला जात होता. या काळात त्या परिसरात कोणाला सिलिंडर लागल्यास ते देण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला असता त्याला ग्राहक थेट घरापर्यंत बोलविले जात होते. ग्राहकांची ही मागणीदेखील डिलिव्हरी बॉय पूर्ण करीत प्रतिबंधित क्षेत्रापर्यंत सेवा दिली. आतादेखील कुठे कोरोना रुग्ण असला तरी त्याच्या घराच्या आजूबाजूला जाऊन सेवा देण्यास ते मागे पुढे पाहत नाही. मात्र या सर्व प्रकारांमध्ये जवळपास २५ डिलिव्हरी बॉयला कोरोनाची बाधा झाली.
सिलिंडर सॅनेटाइज केले का?
कोरोनाच्या काळामध्ये घरी कोणतीही वस्तू आणली की ती सॅनेटाइज करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आपल्या घरी आलेले सिलिंडर सॅनेटाइज करून घ्यावे असे गॅस एजन्सी धारकांकडून सांगितले जात आहे. तसे पाहता सिलिंडर भरतांना त्या ठिकाणी सॅनेटाइज केले जाते. मात्र शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून डिलिव्हरी बॉय आपल्या घरी येत असतात, दक्षता म्हणून सिलिंडर सॅनेटाइज करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र यातही काळजी घेणे आवश्यक आहे.
लसीकरणाची व्यवस्था करणार
निर्बंध काळातदेखील सेवा बजावणाऱ्या गॅस सिलिंडर डिलिव्हरी बाॅयला लस मिळावी यासाठी गॅस एजन्सी कडून कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड व इतर माहिती घेतली जात आहे. काही एजन्सींनी ही माहिती सादर करून कर्मचाऱ्यांना लस दिली आहेत. तर काही एजन्सीने पुरवठा विभाग कडे पत्र पाठवून कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी केली आहे. हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रावर लसीची सुविधा उपलब्ध करुन देणे अथवा फिरते लसीकरण केंद्र घेऊन या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
------------
गेल्या वर्षभरापासून कोरोना असो अथवा इतर कोणतीही परिस्थिती असो या काळात घरोघर जाऊन आणि सेवा देत आहे. लस मिळाल्यास आमचे आरोग्य देखील सुरक्षित राहील. यासाठी कंपनीने माहिती घेतली आहे.
- बाळू गुजर
अत्यावश्यक सेवेदरम्यान गॅस सिलिंडर घरोघर देण्यासाठी आम्ही जातो. मात्र वेळेवर लस मिळाल्यास सेवा बजावीत असताना भीती राहणार नाही. कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यास आमचे कुटुंब देखील सुरक्षित राहील.
- तुळशीराम पाटील.
शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक - ४१,०००
गॅस वितरित करणार्या एजन्सी- १२
घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - २५०
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - १००
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस-००
एकही डोस न घेणारे कर्मचारी - १५०