जळगाव : परीक्षा शुल्कात २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे देण्यात आली आहे.
कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेक पालकांच्या हाताला काम नाही. पालक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे जिल्हा सचिव रोहित काळे व
जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच सांगली, औरंगाबाद, कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयांमधील परीक्षा शुल्कांमध्ये सूट देण्यात आली आहे, त्याप्रमाणे जळगाव महाविदयालयानेसुध्दा सूट दयावी, अशी मागणी निवेदनातून केली होती. दरम्यान, शासकीय अभियांत्रिकीचे प्राचार्य यांनी सोमवारी तातडीने बैठक बोलावून २५ टक्के परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या मागणीला यश आले असल्याचे मासूतर्फे कळविण्यात आले आहे.