लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : जामनेरात बनावट मीठाचा २५ टन साठा आढळून आला आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी बजरंगपुरा रोडवरील एका दुकानात उघडकीस आला. टाटा मिठाच्या नावाने बनावट मिठ विक्री होत असल्याची तक्रार आल्यानंतर अधिकाऱ्यांनी किराणा व्यापाऱ्याची गुरुवारी चौकशी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आला. बजरंगपुरा रोडवरील किराणा दुकानातुन बनावट मिठाची विक्री होत असल्याची तक्रार नागिरकांनी केल्यावरुन चौकशीसाठी दुपारी दुकान व गुदामातील साठ्याची तपासणी करण्यात आली. या दुकानातून ५० किलो वजनाच्या १५ गोण्या जप्त करण्यात आल्या. आयपी इन्हेस्टीगेशन टिमचे फिल्ड ऑफिसर जावेद पटेल, सनवेश उपाध्ये, मोहम्मद चौधरी, अब्दुल्ला खान, अनिल मोरे यांनी तपासणी केली. पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, तुषार पाटील, निलेश घुगे, संदीप पाटील, सचिन चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
गोदाम सील
बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील गुदामात ३६० टाटा मिठाच्या गोण्या असुन गोदाम सील करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरा रात्रीपर्यंत सुरु होते.
२० वर्षापासून मिठाची एजन्सी आहे. यात १२०० गोण्यांचा साठा आहे. दुकानातील काही गोण्यांबाबत त्यांना संशय आल्याने तपासणी केली. आम्ही कोणत्याही बनावट मिठाची विक्री करत नाही.- राजकुमार कावडीया, कोमल एजंसी, जामनेर