लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात मनुष्यबळाअभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये, वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी साधारण विविध अशा २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. कोरोना असेपर्यंत मर्यादीत कालावधीसाठी ही भरती असल्याने मुदत संपल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना यात कमी करण्यात आले होते. मात्र, आम्हाला कायम सेवेत घ्यावे, यासह विविध मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध पातळ्यांवर केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्यांना ठोस आश्वासने मिळाली नाही.
जिल्हाभरात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॅास्पीटल या तीन पातळ्यावंर उपचार पद्धती सुरू करण्यात होती. ९५ काेविड केअर सेंटर, दोन डेडिकेट कोविड हॅास्पीटल आणि त्यानंतर कोविड हेल्थ सेंटर यामध्ये अतिरक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने ही भरती करण्यात आली होती. जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील तब्बल ५्० टक्के पदेही रिक्त होती. ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधीक्षकांची पदे सर्वच रिक्त असल्याचे गंभीर चित्र होते. अशा स्थितीत काेरोनाची दहशत परतवून लावणार कशी हे मोठे संकट जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसमोर होते. त्यानंतर विविध पातळ्यांवर कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात अखेर काही निकष शिथील करून, आयुष, युनानी आदींनाही वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, पुरेशी यंत्रणा उपलब्घ होत नव्हती. दर मंगळवारी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर काही प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झाले. त्यात काही डॅाक्टर, नर्सेस, कक्षसेवक, डाटा एंट्री ऑपरेटर, तंत्रज्ञ अशी सुमारे २५० पदे भरण्यात आली. ३१ नोव्हेंबरला यातील अनेकांची सेवा खंडित केली तर काहींच्या सेवेचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. मात्र, या कंत्राटी कर्माचऱ्यांनी मध्यंतरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आम्हाला सेवेत कायम करून घ्यावे अशी मागणी केली.
मुदत संपल्याने पदावरून हटविले
कंत्राटी पद्धतीने कोविड कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कक्षसेवकांना अचानक एक डिसेंबर रोजी कामावरून परतायला लावल्याने या कक्षसेवकांनी मुदत वाढवून देण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली होती. या कर्मचाऱ्यांना एनआरएचएममध्ये न घेता ठेका पद्धतीने घेण्यात आल्याने नंतर गोंधळाचे चित्र होते.
सामान्य रुग्णालयात ३७ कर्मचाऱ्यांची भरती
एनआरएचएम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात आयुष वैद्यकीय अधिकारी एएनएम आणि विविध तंत्रज्ञ अशा ३७ जागा भरण्यात आल्या होत्या. यात सहाय्यक सहा डॉक्टरांचा समावेश होता. पॅरामेडीकल स्टाफ हा मुद्दा जिल्हा रुग्णालयात कळीचा मुद्दा ठरल्याने स्थानिक पातळीवर तातडीने कोविडसाठी पन्नास कक्षसेवकांचीही भरती करण्यात आली होती. यासह तीस बेड साईड असिस्टंटही नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे हा भार हलका झाला होता.
कोट
कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले. जिथे नातेवाईकही समोर येत नव्हते, अशा स्थितीत आम्ही सेवा दिली. अन्य जिल्ह्यांप्रमाणे सेवेची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आम्ही केली. मात्रपुरावा नसल्याने आम्हाला थेट कमी केले.
- निलेश बोरा,
कंत्राटी कर्मचारी
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या काेरोना काळात पूर्ण वेळ सेवा दिली. शासकीय सर्व कामे पार पाडली. मात्र, कोविड संपल्याने त्यांना तातडीेन कमी करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. किमान पूर्वसूचना देणे अपेक्षित होते.
- जितेंद्र वाणी
कंत्राटी कर्मचारी
या आहेत मागण्या
कोविड काळात सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, रुग्णांची सेवा करणाऱ्या कक्षसेवकांना विमा कवच द्यावे. आगामी आरोग्य विभागाच्या भरतीत ५० टक्के जागा राखील ठेवाव्यात, अन्य जिल्ह्यात जशी मुदतवाढ देण्यात आली, तशी मुदतवाढ द्यावी