जळगाव : खान्देशातील ८३ पैकी २६ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. आधीचं शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर प्रभारी राज सुरू आहे. त्यात महाविद्यालयांमध्ये सुध्दा प्रभारी कारभार सुरू असल्यामुळे ही रिक्त पद कधी भरली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खान्देशात ८३ अनुदानित महाविद्यालय आहेत. महाविद्यालयातील शिक्षण प्रोत्साहित करणे, समन्वय राखणे, परीक्षा व संशोधनाचा दर्जा राखण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे या हेतूने नियमित प्राचार्य असणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ८३ पैकी २६ महाविद्यालयांमध्ये अजूनही प्राध्यापक नाही. काही वर्षांपासून पदभरती देखील बंद होती. काही दिवसांपूर्वी प्राचार्य भरतीला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर ही प्रक्रिया थांबली. सध्या विद्यापीठ असो किंवा सहसंचालक कार्यालय तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग आदी ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर प्रभारी पदभार देण्यात आला आहे. आता महाविद्यालयांमध्ये देखील प्राचार्य नसल्यामुळे प्रभारी राज सुरू आहे. त्यामुळे ही पदे आता कधी भरली जातील. याकडे लक्ष लागून आहे.
खान्देशातील जळगावातील ०७, धुळ्यातील १२ तर नंदुरबार जिल्ह्यातील ७ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी देखील विद्यापीठाने रिक्त जागा भरण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे काही ठिकाणी या आदेशाची देखील अंमलबजावणी झाली नाही.