लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शुक्रवारी शहरात सर्वाधिक २६० रुग्ण आढळून आले असून १८० रुग्ण बरे देखील झाले आहेत. एका बाधिताच्या मृत्यूची नोंद आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र असून शहरात सद्यस्थितीत २४८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जळगाव ग्रामीणमध्ये ४४ नव्या कोरोना रुग्णांची शुक्रवारी नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात आरटीपीसीआरचे २१४१ अहवाल प्राप्त झाले तर ८८१६ ॲन्टीजेन चाचण्या झाल्या. यात ११६७ रुग्ण आढळून आले आहे. चाचण्या वाढल्या मात्र, रुग्णांची संख्या स्थिर असून पॉझिटिव्हीटी कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
ऑक्सिजवरील रुग्ण वाढले
जिल्हाभरात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी ही संख्या १४४१ झाली होती. नियमित आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये आता गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक समोर येत आहे. यात अतिदक्षता विभागात ५१५ रुग्ण दाखल आहेत. ऑक्सिजन बेड कमतरता कायम आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यू वाढले
शुक्रवारी झालेल्या १७ मृत्यूमध्ये ४ एरंडोल तालुका, धरणगाव, पाचोरा तालुका प्रत्येकी ३, यावल तालुका २, जळगाव शहर, जळगाव तालुका, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर या तालुक्यात प्रत्येकी एका बाधिताच्या मृत्यूची नोंद आहे. यात चार रुग्णांचे वय हे ५० वर्षांपेक्षा कमी होते.