लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्ह्यातील काही केंद्रांमध्ये सुरुवात झाली आहे. एकत्रित जिल्हाभरात महसूल आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर ही सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात खासगी आणि शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे ५० टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले आहेत. २० हजार कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली होती. आता दुसरा व पहिला टप्प्याचे काही उर्वरित कर्मचारी अशांचे लसीकरण एकत्रित सुरू राहणार आहे. लसीचे डोस मात्र ४३ हजारच असून वाढीव डोस अद्याप प्राप्त नसल्याची माहिती आहे.
केंद्र वाढविणार
पहिल्या टप्प्यात ८५५४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात महसूल : २ हजार, पोलीस प्रशासन ४२०० तर जि.प., महापालिका, नगरपालिका असे सुमारे २० हजार कर्मचारी दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाचे लाभार्थी राहणार असल्याने आता केंद्रांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आली आहे. एरंडोल आणि भुसावळला रेल्वे हॉस्पिटल हे दोन केंद्र वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.
या आणि लस घ्या..
यादीत नाव असलेल्या कर्मचाऱ्यांना एसएमएस पाठविण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्रावर येऊन लस घ्यायची असल्यास हे कर्मचारी एसएमएस नसला तरी लस घेऊ शकणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी असते प्रक्रिया
लसीकरणासाठी टप्पे ठरविले असून त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून एका तक्त्यात माहिती मागविली जाते, यात नाव, आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक मोबाइल नंबर, वय आणि पत्ता याची माहिती संकलित करून ती कोविन ॲपवर अपलोड केली जाते. ॲपच्या माध्यमातून केंद्रानुसार प्रत्येकी शंभर कर्मचाऱ्यांना एसएमएस पाठविला जातो. त्यात दिनांक, वेळ, ठिकाण यांची माहिती असते. त्या दिवशीच्या वेळेत लाभार्थी केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात.