आॅनलाईन लोकमत
जळगाव-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ व्या पदवीप्रदान समारंभाचे मंगळवारी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात पार पडणार असून, ३५ हजार १६२ स्रातकांना पदव्या, ८४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर २२२ विद्यार्थ्यांना पीएच.डी.बहाल करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेत स्थायिक झालेले अनिवासी भारतीय सुप्रसिध्द वैज्ञानिक व उद्योजक डॉ.अशोक जोशी हे उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाने दीक्षांत सोहळ्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. कार्यक्रमाला कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.बी.पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामु पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठाकडून अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यार्थी परिषदेचे सदस्य व विविध महाविद्यालयातील प्राचार्य देखील उपस्थित राहणार आहेत. यावर्षी प्रथमच पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यंदा पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव छापण्यात आले आहे. तसेच स्नातकाच्या आईचे नाव देखील प्रमाणपत्रावर असणार आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडचा उपयोग मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणीसाठी होणार आहे.
कोण आहेत डॉ.अशोक जोशीडॉ.अशोक जोशी हे अमेरिकेच्या वैज्ञानिक आणि उद्योजक क्षेत्रातील मोठे नाव आहे. ९९६६ मध्ये पुणे येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरींग येथून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या अशोक जोशी यांनी १९७० मध्ये अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून एम.एस. आणि १९७२ मध्ये पीएच.डी पदवी प्राप्त केली. १९७३ मध्ये पेन्सेलव्हेनिया विद्यापीठातून ते पोस्ट डॉक्टरल झाले. अमेरिकेतील मान्यताप्राप्त संशोधक आणि उच्च तंत्रज्ञानातील उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. ऊर्जा, पर्यावरण, जौवतंत्रज्ञान या क्षेत्रात त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केलेले असून १०० पेक्षा अधिक अमेरिकन पेटंट त्यांच्या नावावर आहेत. भारतातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे.
प्रत्यक्ष पदवीघेण्यासाठी २१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी पदवीप्रदान समारंभात ३५ हजार १६४ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ११ हजार ९२५ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३ हजार ३२५ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार २४२ आणि आंतर विद्याशाखेचे ६६३ स्नातकांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये २२२ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.