लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील कोरोनाबाधितांचे होणारे मृत्यू थांबविणे प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे. यात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने मृत्यू होत असून सात दिवसांत २७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील मृतांची संख्या ही ४०० वर पोहोचली आहे. यात रुग्ण उशिरा रुग्णालयात येत असल्याचे प्रमुख कारण नोंदविले जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव शहरात सर्वाधिक संसर्ग नोंदविला गेला. त्यानंतर चोपडा तालुक्यात संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढले. जळगाव शहरात मृतांची संख्याही झपाट्याने वाढल्याने अधिकच चिंतेचे वातावरण आहे. पहिल्या लाटेत कमी वयाच्या मृतांची संख्या कमी होती. मात्र, या दुसऱ्या लाटेत ही संख्या वाढल्यानेच अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हाभरातील गंभीर रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. या ठिकाणीही मृतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचे चित्र आहे. शनिवारी या ठिकाणी १० मृत्यूंची नोंद होती.
कमी वयाचेही मृत्यू
या आठवडाभरात मृत्यू झालेल्यांमध्ये चार रुग्ण हे ५० वर्षे व त्यापेक्षा कमी वयाचे हाेते. यात ३ एप्रिल रोजी ५० वर्षीय दोन रुग्ण, २ एप्रिल रोजी ३२ वर्षीय महिला, ३१ मार्च रोजी ४८ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे.
असे झाले मृत्यू
२९ मार्च - ३
३० मार्च - ३
१ एप्रिल - ४
२ एप्रिल - ६
३ एप्रिल - ४
४ एप्रिल - ३
शहरात एकूण रुग्ण : २४,७४९
शहरात एकूण मृत्यू : ४००
शहरातील बरे झालेले रुग्ण : २१,८४९
शहरात उपचार घेणारे रुग्ण : २५००
शहराचा मृत्युदर : १.६१ टक्के
शहराचा रिकव्हरी रेट : ८८.२८ टक्के