जळगाव : जळगाव, धुळे व मालेगाव पोलिसांसाठी ‘मोस्ट वॉँटेड’ आणि तब्बल २७ दुचाकी चोरऱ्या वैभव उर्फ दयावान देविदास बैरागी (२६, रा.कुंझर, ता. चाळीसगाव ह.मु. कुंभारवाडा, पिंप्राळा, जळगाव) या अटक करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात त्याने ९ दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत. दरम्यान, दयावान हा फक्त एका विशिष्ट कंपनीच्याच दुचाकी चोरुन त्याची ग्रामीण व आदीवासी भागात अवघ्या ५ ते दहा हजार रुपयात विक्री करायचा.जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेत मोटार व्हेईकल कक्षाची स्थापना केली आहे. जेथून वाहन चोरी गेले त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा समांतर तपास हे कक्षातूनही केला जातो. या कक्षाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच चोरीच्या ९ दुचाकी हस्तगत करण्यासह अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याने २७ दुचाकींची कबुली दिली आहे. या दुचाकी घेण्यासाठी पथके पुणे व इतर भागात पोहचली आहेत.दयावान हा धुळे जिल्ह्यातील १४ गुन्ह्यात मोस्ट वॉँटेड आहे. एका गुन्ह्यात त्याचा साथीदार पकडला गेला होता, मात्र हा तेव्हा निसटला होता. जळगाव जिल्ह्यात जिल्हा पेठ, एरंडोल, जळगाव शहर, रामानंद नगरसह औरंगाबाद येथेही त्याने दुचाकी चोरी केल्या आहेत, तशी कबुली त्याने दिली. जिल्ह्यातील गुन्ह्यात फरार असताना तो पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रा.का.पाटील, विनोद पाटील, अरुण राजपूत, किशोर राठोड, रणजीत जाधव व अशोक पाटील यांचे एक पथक पुण्यात रवाना झाले होते.तर दुसरीकडे विजय पाटील, नरेंद्र वारुळे, जितेंद्र पाटील व दीपक पाटील यांचे पथक दयावान कोणाच्या संपर्कात आहे व तो सद्यस्थितीत कुठे आहे याची माहिती काढून बाहेर गेलेल्या पथकाला पुरवित होते. त्यामुळे हा चोरटा हाती लागला. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी स्थापन केलेल्या कक्षाचे हे फलित आहे. या कक्षाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे.दयावान हा एकाच कंपनीच्या व जास्तीत जास्त वर्ष, दोन वर्षापूर्वी घेतलेल्याच दुचाकीच चोरी करायचा. या दुचाकींना बनावट चावी लवकर लागते, म्हणून विशिष्ट कंपनीच्या दुचाकीला त्याची पसंती असायची. बाहेर जिल्ह्यात दुचाकी विक्री करताना ५ ते १० हजार रुपये घेऊन कागदपत्रे नंतर आणून देतो अशी बतावणी तो करीत असे. दरम्यान, सर्वच दुचाकींना बनावट क्रमांक टाकून त्याची विक्री तो करीत असे. शहरातील १३ गुन्ह्यांमध्ये त्याचा थेट सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, शरद भालेराव, विनोद पाटील, अनिल देशमुख, रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी, राहूल पाटील व परेश महाजन या पथकाने ही कामगिरी बजावली. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला मोस्ट वॉंटेड दयावान हा नव्या दुचाकी चोरुन औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात अगदी कमी किमतीत ५ ते १० हजारात या दुचाकीची विक्री करीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्याची माहिती काढून त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले. कुंझर, ता.चाळीसगाव येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याला घरातूनच ताब्यात घेतले.
२७ दुचाकी चोरणारा ‘दयावान’ गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:54 PM