लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक सुविधा निर्माण झाल्या असून याची प्रचिती म्हणजे या ठिकाणाहून गंभीरावस्थेतील रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. शिवाय यंत्रणेचे आभारही मानत आहेत. गेल्या दहा दिवसांत या रुग्णालयातून गंभीर असे २७१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. दोन्ही लाटांचा विचार केला तर ६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना या रुग्णालयाने कोरेानामुक्त केले आहे.
सुरूवातीच्या काळात जीएमसीत येण्यासाठी रुग्ण भीत होते. या ठिकाणचा मृत्यूदर वाढल्याने भीतीदायक वातावरण निर्मणा झाले होते. मात्र, विविध पातळ्यांवर झालेल्या सुधारणा, कार्यरत विविध समित्या यामुळे या ठिकाणचा मृत्यूदर घटून आता रिकव्हरी रेट वाढला आहे. विशेष बाब म्हणजे अतिशय गंभीर रुग्णही या ठिकाणाहून बरे होऊन जात असल्याने यंत्रणेचे आभार मानत आहेत. यातील एका कुटुंबाने तर यंत्रणेच्या उत्तम सेवेबद्ददल ३१ हजारांचा धनादेशही दिला होता.
बेड आहेत खाली
गेल्या काही दिवसांपासून अत्यंत बिकट परिस्थितीतही रुग्ण नाकारता सेवा देणाऱ्या या यंत्रणेत एक दिलासादायक चित्र असून प्रथमच काही प्रमाणात बेड उपलब्ध आहे. शिवाय आपात्कालीन कक्षात असलेल्या पाच बेडपैकी तीन बेड रिक्त रहात आहेत.
दिवसानुसार रिकव्हरी
२१ एप्रिल २४
२२ एप्रिल २८
२३ एप्रिल ४३
२४ एप्रिल १०
२५ एप्रिल २४
२६ एप्रिल २६
२७ एप्रिल १४
२८ एप्रिल ४०
२९ एप्रिल २५
३० एप्रिल ३७
ते व्हेंटीलेटर सुस्थितीत
पीएम केअर फंडातून दोन टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ५० व्हेंटीलेटर मिळाले आहे. यातील दहा व्हेंटीलेटर आधीच कार्यान्वयीत करण्यात आले असून यातील ४० व्हेंटीलेटरचा शुक्रवारी डॉक्टरांच्या उपस्थितीत डेमो घेण्यात आला. हे व्हेंटीलेटर सुस्थितीत असून लवकरच ते आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.भाऊराव नाखले, डॉ. विजय गायकवाड, डॉ. उमेश जाधव, डॉ. तुषार सोनवणे, डॉ. शालमी खानापूरकर आदी उपस्थित होते.