जळगाव: फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेट आणि ट्रीपलसीट, फॅन्सी नंबर प्लेटद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. शहर वाहतूक शाखेने दादा, काका, राजे, अण्णा, मामांना (फॅन्सी नंबर प्लेट) कारवाईतून जोरदार झटका दिला. त्याशिवाय कर्णकर्कश २८ सायलेन्सर जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर रोडरोलर फिरवून ते नष्ट केले जाणार आहे.
बुलेटचा सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिली आहे. त्यानुसार काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई सुरू केली. त्यात २८ बुलेटधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई झाली. एवढेच नव्हे तर ट्रीपलसीट, विना क्रमांक नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणा-यांवर सुध्दा वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नवीन सायलन्सर आणा...वाहतूक शाखेतच बसवा...अन् दंड भरून निघा...ज्या बुलेट राजांनी सायलेन्सरमध्ये बदल केले आहे. अशा वाहनधारकांचे वाहन पकडून त्यांचे वाहन शहर वाहतूक कार्यालयामध्ये नेले जाते. नंतर संबंधित वाहन मालकाला नियमानुसार असलेले नवीन सायलन्सर आणून ते तिथेच बसविण्यास सांगून मॉडिफाइड सायलेन्सर शहर वाहतूक शाखेत जमा केले जाते. जमा झालेले सायलेन्सर बुलडोझर खाली चक्काचूर केले जाणार आहेत. तसेच काही वाहनधारक नियमाप्रमाणे नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट लावल्याचे आढळले. अशा अनधिकृत नंबर प्लेट्स वाहनचालकांवर कारवाई झाली आहे.