लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना होणार आहे. जून महिन्यात त्यांना दरमहा ८ रुपये किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जाणार आहेत. या योजनेत केशरी कार्डधारकांना प्रति माह प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. शासकीय गोदामे आणि रास्त भाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या धान्यातून सध्या हे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाने बुधवारी याबाबतचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार कुटुंबांना मे २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सवलतीच्या दराने धान्य वितरण करण्यात आले होते. मात्र या कालावधीत धान्याची पुरेशी उचल झालेली नसल्याने हे अन्नधान्य जून २०२१ या कालावधीत गहू ८ रुपये आणि तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने हे धान्य वितरित करण्यात यावे. वितरणाच्या आधी धान्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक रास्त भाव दुकानातील पाच लाभार्थ्यांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक
बीपीएल - ४७,०९५०
अंत्योदय - १३,७७४९
केशरी - ३२,३०११
बीपीएलच्या ४ लाख ७० हजार कुटुंबांना लाभ
जिल्ह्यात या आधी सुरू असलेल्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार लाख ७० हजार ९५० बीपीएल शिधापत्रिकाधारकांना मिळाला आहे. तसेच अंत्योदय योजनेतील १ लाख ३७ हजार ७४९ जणांना या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे.
केशरीच्या ३ लाख २३ हजार कुटुंबांना मिळणार लाभ
जून महिन्यात जिल्ह्यातील ३ लाख २३ हजार ११ कुटुंबांना या सवलतीच्या दरातील धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षीदेखील अशा प्रकारे या योजनांचा लाभ केशरी कार्डधारकांना देण्यात आला होता. त्यांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात आले होते. आतादेखील राज्य सरकारने शिल्लक राहिलेल्या धान्यातून सवलतीच्या दरात धान्य देण्याचे आदेश दिले आहेत.