जळगाव आगार : फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनसाठीच सुटताहेत बसेस
एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे महामंडळाच्या सेवेवर याचा मोठा परिणाम झाला असून, फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडण्यासाठी बसेस बाहेर पडत आहेत. त्यामुळे जळगाव आगाराला संचारबंदीच्या या काळात दररोज ३ लाखांचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचार बंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या सूचनांचे पालन करीत राज्य परिवहन महामंडळानेही पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, लातूर आदी मार्गावरच्या सेवा बंद ठेवून, जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांना सोडण्यासाठीच बस सेवा सुरू ठेवली आहे. तसेच संचारबंदीमुळे नागरिकही घराबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या प्रवासी संख्येवर याचा मोठा परिणाम झाला असून, दररोज काही लाखांवर येणारे उत्पन्न आता काही हजारांवर आले आहे. आधीच कोरोनामुळे निम्म्यावर आलेले उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटले आहे.
इन्फो :
३० ते ४० लाखांचा फटका
शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत जळगाव आगारातर्फे गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बस सेवा सुरू आहे. त्यानुसार संचारबंदीच्या पहिल्या दिवशी आठ फेऱ्या तर दुसऱ्या दिवशी १२ फेऱ्या झाल्या होत्या. यातून दोन दिवसांत फक्त १ लाखांच्या घरात उत्पन्न आले. लॉकडाऊन पूर्वी होणाऱ्या दररोज होणाऱ्या १५० ते २०० फेऱ्या आता संचारबंदीत बोटावर मोजण्या इतक्याच होत असल्याने जळगाव आगाराचे दररोजचे तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न बुडत आहे. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने या १५ दिवसात एकट्या जळगाव आगाराला ३० ते ४० लाखांचा आर्थिक फटका बसणार आहे.
इन्फो :
संचारबंदी असल्याने जळगाव आगारातर्फे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर मार्गावरचे पुरेसे प्रवासी आले तर, त्यांच्या साठीही बसेस सोडण्यात येतील. मात्र, संचारबंदीमुळे त्या प्रकारचे प्रवासीही उपलब्ध होत नसल्याने, याचा महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार