शहर पोलीस स्टेशननजीक चोरी : चार तासातच चोरटा जेरबंद
जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात व अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आणि शहर पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नटवर मल्टीप्लसेक्स जवळील कुमार शर्टस् या शोरुममधून तीन लाख ३३ हजार रुपयांची चोरी झाल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले दरम्यान, या घटनेतील आरोपीस अवघ्या चार तासात पोलिसांनी जेरबंद करण्यात आले असून तो शो रुममधील कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे.
रेल्वे स्टेशन परिसर तसेच मल्टीप्लेक्स असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत या रस्त्यावर वर्दळ असते, असे असताना येथे चोरी झाली हे विशेष. दिनेश धनजी सहार यांच्या मालकीचे हे शोरुम आहे. सोमवारी सकाळी ९.३0 वाजता दुकान उघडल्यानंतर कॅशियर दीपक पंड्या हे बसले असता त्यातील रोकड गायब झाल्याचे लक्षात आले. नंतर शोरुमधून आणखी काही माल गेला आहे का? याची तपासणी केली असता काऊंटरजवळील सीसीटीव्ही कॅमेर्याची वायर तोडलेली दिसली तर वरच्या बाजुला शेडचा पत्रा कापलेला दिसला. चोरट्याने बाजुच्या गल्लीतून वरच्या मजल्यावर जाऊन शोरुमचा पत्रा कापून आत प्रवेश केला. घटनास्थळावर श्वान पथक व फिंगर प्रिंट विभागाला पाचारण करण्यात आले होते.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांच्यासह एलसीबीचे सुधाकर अंभोरे, रवींद्र घुगे, रवींद्र गिरासे, शरद भालेराव, भास्कर पाटील, संजय पाटील, नुरुद्दीन शेख आदींचा ताफा लागलीच घटनास्थळावर दाखल झाला. श्वान पथकाचे जी.एन.भगत व एस.जे.नाईक यांनी गौरी या श्वानामार्फत तपासणी केली असता शेजारच्या दुकानापर्यंत माग दाखविण्यात आला.
गुन्हा दाखल होण्याआधीच आरोपी जाळ्य़ात
सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी अवघ्या चार तासात आरोपीला शोधून काढले तसेच त्याच्याकडून चोरीस गेलेली रक्कमही जप्त करण्यात आली. राहुल रामदास कोळी (वय २0) रा.जैनाबाद , जळगाव असे चोरट्याचे नाव आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्याच्या आधीच आरोपी व मुद्देमाल वसूल झाल्याचा पहिलाच अनुभव आहे.