जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. आता विद्यार्थ्यांना २७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. दुसरीकडे आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ३ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी २ हजार २७३ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रथम व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया समन्वयक पी. पी. गडे यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यात अभियांत्रिकीची १३ तर फार्मसीची १२ अशी एकूण २५ डिप्लोमा महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ‘ई-स्क्रूटिनी’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. दरम्यान, विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत अर्जांची मुदत देण्यात आली होती. नंतर ती वाढवून २० ऑगस्ट करण्यात आली होती. आता पुन्हा त्यात वाढ देण्यात आली असून, २७ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.
१,१११ विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपूर्ण
जळगाव जिल्ह्यातील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या एकूण तीन हजार जागांसाठी आतापर्यंत ३ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहेत. त्यातील २ हजार २७३ विद्यार्थ्यांनी अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. मात्र, १ हजार १११ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात त्रुटी व कागदपत्रे अपूर्ण आढळून आली आहेत.
४ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी होणार जाहीर
डिप्लोमा प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी ही ३० ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. नंतर यादीसंदर्भात काही तक्रार असल्यास ती ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सादर करता येतील. शेवटी ४ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.