जळगाव : विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी ३ हजारांची लाच घेणाऱ्या चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचा हे.कॉ. दीपक देवीदास ठाकूर यास अटक करण्यात आली. धुळे एसीबीच्या पथकाने पोलीस ठाण्यातच मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली.
तक्रारदार यांच्या बहिणीने तिचा नवरा, सासू, सासरे व नणंद यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास दीपक ठाकूर याच्याकडे होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक कधी करणार याबाबत तक्रारदार यांनी विचारपूस केली असता ठाकूर याने कारवाईसाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर ३० रोजी तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना ठाकूर यास पथकाने रंगेहात पकडले.
दोन महिन्यांपूर्वी असाच झाला होता ट्रॅपविवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर सादर करण्याच्या मोबदल्यात ४ हजारांची लाच घेणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे व पोलीस नाईक शैलेश आत्माराम पाटील यांना अटक झाली होती. २८ जून २०२२ रोजी ही कारवाई झाली होती.