लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मोहाडी परिसरात तयार होत असलेल्या महिला रुग्णालय व माता बालसंगोपन केंद्रासाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात ३० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या रुग्णालयात महिलांची प्रसुती, उपचार व नवजात बालकांवर लसीकरण अशा सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील आरोग्यासह रेल्वे, महामार्गासाठी देखील चांगली तरतूद करण्यात आल्याची माहिती उन्मेष पाटील यांनी दिली.
केंद्रीय अर्थसंकल्पात जिल्ह्याला मिळालेल्या निधीबाबत व शेतकरी, कामगारांसाठीच्या योजनांची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात रविवारी खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शहरातील मोहाडी परिसरात राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत १०० खाटांचे रुग्णालय तयार होत असून, यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ३० कोटींची तरतूद करण्यात आल्याने कामाला गती येणार असून, त्यानुसार जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक महिलांना या रुग्णालयांमुळे चांगल्या सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.
शहरात क्रिटिकल केअर सेंटर तयार करावे-महापौरांची खासदारांकडे मागणी
जळगाव शहराचा फायदा होण्यासाठी काही तरतुदींचा आणि विकासात्मक बाबी अर्थसंकल्पात समावेश करून त्याचा पाठपुरावा करावा असे निवेदन महापौर भारती सोनवणे यांनी खासदार उन्मेष पाटील यांना दिले आहे. केंद्र सरकारने देशात काही क्रिटिकल केअर सेंटर उभारण्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे. जळगाव शहरातील कोरोनाचा इतिहास लक्षात घेता शहरात क्रिटिकल केअर सेंटर तयार करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने तरतूद केलेले क्रिटिकल सेंटर शहरात तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून जागा आणि आवश्यक त्या पूर्तता तातडीने करण्यात येतील तरी आपण शासनाकडे तत्परतेने पाठपुरावा करावा, अशी मागणी देखील महापौरांनी केली. याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन खासदारांनी यावेळी दिले.