ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.30 - वस्तू व सेवा करानुसार (जीएसटी) वस्तू, साहित्याच्या विक्रीसंबंधी शहरातील 15 हजार विविध दुकानदार, व्यावसायिकांनी आपले जमाखर्चाचे सॉफ्टवेअर बदलले आहेत. आता मूल्यवर्धीत कराऐवजी जीएसटीनुसार ग्राहकांना संगणकीकृत बिले दिले जातील. दालमिल मालकांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी 30 कोटींची उलाढाल ठप्प झाली.
1 जुलैपासून दुकानदाराला ग्राहकाला बिल देताना ग्राहकाचा जीएसटी क्रमांक, इ मेल, पूर्ण पत्ता आदी माहिती घ्यावी लागेल. तसेच केंद्रीय दर निश्चिती समितीने सूचित केल्यानुसार (निर्देशीत वस्तू दर यादी) संबंधित वस्तूवर जीएसटी आकारावा लागेल. आतार्पयत व्हॅट आकारला जायचा. त्यामुळे विविध जमाखर्च सॉफ्टवेअरमध्ये व्हॅटनुसार रचना केली होती. पण ही रचना जीएसटीमुळे बदलावी लागली आहे. जमाखर्च सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल केले असून, हे सॉफ्टवेर शहरातील दुकानदार, व्यावसायिकांनी बसवून घेतले.
बॅ्रण्डेड डाळींवर 5 टक्के जीएसटीला विरोध म्हणून शुक्रवारी शहरातील 110 दालमील बंद ठेवण्यात आल्या. दालमील असोसिएशनच्या नेतृत्वात हा बंद पाळण्यात आला. त्यामुळे 2500 कामगारांचा रोजगार बुडाला तसेच 30 कोटींची उलाढाल ठप्प झाली. 1 जुलै रोजी दालमील नियमित सुरू होतील, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी दिली.