लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपमधून फुटलेल्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपने बुधवारी विभागीय आयुक्तांकडे तब्बल तीस हजार कागदपत्रे जमा केली आहेत. या तीस हजार कागदपत्रांमध्ये प्रत्येक नगरसेवकाचे मनपा निवडणुकीत अर्ज दाखल करण्यापासून ते महापौर निवडणुकीत पक्षाने बजावलेल्या व्हीपसह इतर महत्त्वाची कागदपत्रे या प्रस्तावात जोडली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
एक नगरसेवकाचा अपात्रतेच्या प्रस्तावासोबत अकराशे ते बाराशे कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. यामध्ये २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत संबंधित नगरसेवकाला पक्षाने दिलेला एबी फॉर्म, त्यावर नगरसेवकांनी केलेली स्वाक्षरी, महानगरपालिकेचा विविध महासभा व स्थायी समितीच्या सभेत संबंधित नगरसेवक असलेले सूचक व अनुमोदक याबाबतची कागदपत्रे, नगरसेवकांनी मांडलेले महासभेतील प्रस्ताव, यासह महासभेतील विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी मांडलेल्या प्रश्नांबाबतचे व्हिडिओ चित्रणाची सीडी, महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान पक्षाने संबंधित नगरसेवकांना ई-मेल, व्हाॅट्सॲप, प्रत्यक्ष घरी जाऊन दिलेले व्हीप यासह पोस्टाने बजावण्यात आलेले पक्षाचे व्हीप इतर कागदपत्रेदेखील या प्रस्तावासोबत जोडण्यात आलेली आहेत. तसेच पक्षाने मांडलेला युक्तिवाददेखील या प्रस्तावासोबत जोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नगरसेवक सहलीला रवाना होताच कागदपत्रांची करण्यात आली जुळवाजुळव
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीआधी भाजपचे काही नगरसेवक सहलीला रवाना झाल्यानंतर, विमानतळावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या बैठकीत दरम्यानच नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याबाबतच्या सूचना गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. याची जबाबदारी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, ॲड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे या चार नगरसेवकांवर सोपवण्यात आली होती. नगरसेवकांच्या पात्रतेसाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी भाजपने तब्बल चार वकिलांना देखील कामाला लावले होते. नगरसेवकांचा अपात्र ते बाबतच्या प्रस्तावात कोणतीही कमतरता राहू नये अशा सूचना गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या अशीही माहिती भाजपच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.