लोकमत न्यूज नेटवर्क
कुरंगी, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या बाबरूड राणीचे येथील गाव शिवारातील एका भिल्ल समाजाचा ज्येष्ठ नागरिकाच्या बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले.
घटनास्थळी महावितरण, पोलीस व पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तर ‘महसूल’चे अधिकारी अनुपस्थित होते. दि. १२ एप्रिलला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बांबरुड राणीचे येथील राजाराम सखाराम भिल्ल (६८) यांच्या मालकीच्या १० बोकड, २२ शेळ्या अशा एकूण ३२ शेळ्या भूमिहिन असलेले राजाराम भिल हे संसाराचा गाडा हाकत होते. जुन्ने शिवारात व वनविभागाला लागून शेतावर बसवलेल्या असताना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मुख्य विजेची लाईनवरील क्लँम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडल्यामुळे शेतातील ३२ बकरी जागेवरच तडफडून मरण पावल्या.
मोठी घटना टळली
राजाराम भिल्ल हे ज्या ठिकाणी राहत होते, त्या ठिकाणी झोपडीत रात्री वन्यप्राण्यांच्या बचावासाठी त्या शेळ्यांना कोंडून ठेवत होते व दररोज सकाळी झोपडी शेजारी तारेचे वाॅल कंपाैंड केलेले होते, त्याठिकाणी त्या शेळ्यांना ठेवत होते. दररोजच्या नियमानुसार शेळ्या तार कंपाैंडमध्ये टाकल्यानंतर व राजाराम भिल्ल हे झोपडीतील साफसफाई करून सकाळचा चहा करत असतानाच मोठा किंचाळण्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर बघितले तर ३२ शेळ्या यांच्या अंगावर विजेची तार पडून त्या तडफडत मृत्यू पावत होते तर तेथेच एका निंबाच्या झाडाखाली एक दुधाळ गाय, वासरू बाधलेले होते.
तुटलेली विजेची तार त्या निंबावर पडल्याने गाय, वासरू व राजाराम भिल्ल हे बालंबाल बचावले. घटनास्थळी ‘महावितरण’चे लासलगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दीपक बानबाकूडे, लाईनमन अनिल मिस्तरी, वासुदेव पाटील, प्रेमचंद राठोड, अकिल मेवाती यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश बारी, युवराज चौधरी यांनी जागेवर मृत झालेल्या पशुधनाचे शवविच्छेदन केले.
पोलीस प्रशासनाचे सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एवढी मोठी घटना घडली असताना महसूल विभागाची अनुपस्थिती दिसून आली. मृत झालेल्या शेळ्यांची आजच्या बाजारभावानुसार ४.५० लाखांचे नुकसान झाले असून ते त्वरित मिळावे, अशी मागणी केली जात आहे.