लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ, जामनेर व बोदवड या ठिकाणी सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे शनिवारी बीएसएनएलच्या अनेक ठिकाणी केबल तुटल्यामुळे ३२ टॉवर बंद पडले होते. यामुळे बीएसएनएलचे घरगुती फोनसह मोबाइल फोन दोन तास ठप्प झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.
जळगाव बीएसएनएल विभागाने दिलेल्या माहिती नुसार, भुसावळ, जामनेर व बोदवड या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. शनिवारी या महामार्गावर भुयारी गटारी व नाल्यांसाठी अनेक रस्त्यांचे खोदकाम सुरू होते. या कामामुळे या तिन्ही ठिकाणी बीएसएनएलच्या ''ऑप्टिकल फायबर'' च्या मोठ्या प्रमाणावर केबल तुटल्या. या केबलवर या तिन्ही तालुक्यांत घरगुती व मोबाइल फोनची सेवा कार्यान्वित असलेली सेवा पूर्णपणे बंद पडली. संबंधित ठिकाणी काम होईपर्यंत दुपारी १२ ते ३ पर्यंत ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. अचानक सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. सुमारे ३२ टॉवर बंद पडल्यामुळे बीएसएनएलचे सीम कार्ड असलेल्या ग्राहकांना चांगलाच गैरसोयीचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे अनेक नागरिकांनी बीएसएनएलकडे तक्रारी करून, तीव्र नाराजी व्यक्त केली.
इन्फो :
दोन ते तीन तासांनी सेवा सुरळीत
या केबल तुटल्यानंतर बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ केबल तुटलेल्या ठिकाणी केबल जोडायला सुरुवात केली. जसजसे जोडणीचे काम पूर्ण होत होते. तसतशी त्या-त्या भागातील सेवा सुरळीत झाली. काही ठिकाणी दोन तासांनी तर काही ठिकाणी तीन तासांनी सेवा सुरू झाल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, रस्ते कामाच्या ठिकाणी अनेकवेळा केबल तुटण्याचे प्रकार घडत असून, महामार्ग प्रशासनातर्फे याबाबत कुठलीही पूर्व कल्पना देण्यात येत नाही. तसेच केबल दुरुस्तीचा खर्चही देण्यात येत नाही. त्यामुळे केबल तुटून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो :
शनिवारी भुसावळ, बोदवड व जामनेर या ठिकाणी रस्त्यांच्या कामामुळे अनेक ठिकाणी ऑप्टिकल फायबरच्या केबल तुटल्या. यामुळे ३२ टॉवर बंद पडले होते. रस्त्याचे काम झाल्यानंतर बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ केबल जोडून सेवा सुरळीत सुरू केली.
संजय केशरवाणी, महाव्यवस्थापक, जळगाव बीएसएनएल विभाग