लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या लसीकरणात खंड नको म्हणून वरिष्ठ पातळीवरून कमी- अधिक प्रमाणात लसींचे डोस पाठविले जात असून आता हे डोस वयोगटानुसार प्राप्त होत आहेत. यात सोमवारी कोविशिल्डचे एकूण ३३५०० तर कोव्हॅक्सिनचे ७७० डोस प्राप्त होणार आहेत. मात्र, यात १८ ते ४४ वयोगटासाठी केवळ कोविशिल्ड लसच उपलब्ध राहणार आहे.
४५ वयाेगटाच्या दुसऱ्या डोसचेही नियोजन सोबतच सुरू असल्याने केंद्रांवर गर्दी वाढली आहे. अगदी सुरुवातीला शुकशुकाट राहत असलेल्या केंद्रांना गेल्या आठवडाभरात यात्रेचे स्वरूप आले आहे. त्यातच लसींचे डोस मुबलक असल्याने नागरिकांची गर्दी वाढली आहे. मात्र, गर्दी करू नका, संयम ठेवा, दुसऱ्या डोससाठी थोडा उशीर झाला तरी परिणाम सारखाच असतो, असे आवाहन डॉक्टर वारंवार करीत आहेत. मात्र, केंद्रांवरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हे डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णाच्या औषधशास्त्र विभागात येणार असून सायंकाळपर्यंत ते केंद्रांना वाटप करण्यात येणार आहेत. या डोसचा वापर मंगळवारपासून होणार आहे.
असे आहेत डोस
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड २४ हजार ८००
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन ७७०
१८ ते ४४ वयोगटासाठी कोविशिल्ड ८ हजार ७००
कांताई नेत्रालयात आजपासून ४५ वर्षांवरील लसीकरण
कांताई नेत्रालयात सोमवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. केंद्रांवर आता गर्दी टाळण्यासाठी कुपनपद्धती सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून या केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. मात्र, सर्व काही लस उपलब्धतेवर अवलंबून राहणार असून नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.