जळगाव : मेहरूण तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी सुशोभिकरणाचा ३३ कोटी ७४ लाखांचा मनपाने दिलेला प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे रवाना केला आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन निधी उपलब्ध झाल्यास मेहरूण तलावाचा चार टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. शहरातील एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून मेहरूण तलावाचा विकास करण्याचे प्रयत्न मनपाकडून सुरू आहेत. त्यासाठी महापौर नितीन लढ्ढा यांच्या पुढाकाराने उन्हाळ्यात तलावातील गाळ लोकसहभागातून उपसण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे तलावाची खोली वाढून पाणीसाठा वाढला. तसेच जिल्हा नियोजन व विकास समितीकडून वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून मेहरूण तलावासाठी १ कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यातून गणेशघाटाचे काम करण्यात आले आहे. तर आणखी १ कोटीचा निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
चार टप्प्यात मेहरूण तलावाच्या विकासाचा प्रस्ताव मुरुमाचा भराव टाकून तलावाच्या बाजूने जॉगिंग ट्रॅक करणे त्याची लेव्हलींग करणे, पावसाचे पाणी वाहण्यासाठी आरसीसी गटार करणे, तलावाच्या बाजूने उद्यानाजवळ ६ मीटर रूंद १०० मीटर लांब वर्तुळाकार आरसीसी पूल बनवणे, पोलीस चौकी उभारणे आदी कामांचा समावेश असून त्यासाठी ८ कोटी ४७ लाख, ४१हजार २६० रुपये खर्च अपेक्षित आहे. तलाव काठच्या वर्तुळाकार रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, पार्किंगची व्यवस्था करणे, जॉगिंग ट्रॅक तयार करणे या कामासाठी ८ कोटी ५७ लाख ३५ हजार १७० रुपये खर्च अपेक्षित आहे. तलावाच्या काठाने भिंत उभारणे (टो-वॉल), तलावाच्या काठाचे दगडी पिचिंग करणे, बैठक व्यवस्था करणे, पार्किंगजवळ व जॉगिंग ट्रॅकजवळ वृक्षारोपण करणे, पथदिवे बसवणे, उद्यानात दिवे व हायमास्ट बसवणे, फूड प्लाझा, म्युझिकल वॉटर फाउंटेन, एरोबिक व जीमसाठीचे साहित्य तीन ठिकाणी बसवणे, सुरक्षा रक्षक केबिन व तिकीट खिडकीची व्यवस्था करणे, योगा व ध्यानधारणा हॉल उभारणे या कामांचा समावेश आहे. त्यासाठी ८ कोटी ९ लाख ६३ हजार ७३० रुपये खर्च येणार आहे. जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसवणे, बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी टाईल्स बसवणे, लेक सेंटर वॉल व पक्षी निरीक्षणासाठी टॉवर उभारणे, तलाव ओव्हर फ्लो होण्याच्या ठिकाणी ६ मीटर रूंद व ७५ मीटर लांब पूल उभारणे, पूर्वेकडील बाजूस सांडपाण्यासाठी भुयारी गटार करणे, अॅम्पी थिएटर व म्युझिकल गार्डन उभारणे, आदी कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ९९ लाख ६२ हजार ६२८ रुपये खर्च येणार आहे.