लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री फैजपूर येथील वाघोदा फाट्यावर गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारा कंटेनर अडविला. त्यातील ३४ जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यात दोन गाय व ३२ गोर्हे यांचा समावेश होता. या सर्व जनावरांचे वय तीन ते आठ वर्षाच्या दरम्यान होते. या मृत जनावरांना जळगावातील कुसुंबा गोशाळेच्या परिसरात दफन करण्यात आले.
दरम्यान, जनावरे भरून आलेला कंटेनर मध्यप्रदेशातून आल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोदा फाट्यावर कंटेनर आल्यानंतर फैजपूर पोलिसांच्या मदतीने हा कंटेनर जसाचा तसा कुसुंबा गोशाळेत आणण्यात आला. पहाटे तीन वाजता हा कंटेनर पोहोचला. तेथे उघडून पाहिले असता सर्व जनावरे मृत झालेले होते. सर्वांचे पोट फुगले होते कंटेनरमधून प्रचंड दुर्गंधी बाहेर येत होती. जनावरांची स्थिती पाहिल्यानंतर किमान तीन दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज गोशाळेतील कर्मचाऱ्यांनी वर्तविला दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव शहरातील बजरंग दलाचे मोहन तिवारी, राकेश लोहार, जितू पाटील, गणेश बच्छाव, आकाश पाटील व मुकेश पाटील यांनी कुसुंबा गोशाळेत धाव घेतली.
पाच एकर जागेत केले दफन
कुसुंबा गोशाळा लागुनच संस्थेची पाच एकर जागा आहे. या ठिकाणी मृत झालेल्या जनावरांना दफन केले जाते. गुरुवारी सकाळी जेसीबीच्या माध्यमातून खोल खड्डे करून ही जनावरे त्यात दफन करण्यात आली. गोशाळेचे वाल्मिक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली. सकाळी सात वाजे पासून सुरू झालेले हे काम दुपारी दोन वाजता संपले.