जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या चौबे मार्केट ते बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने लहान-मोठे ३५ हून अधिक खड्डे आहे. त्यात मुख्य म्हणजे मुख्य भाजी मंडईतील सुभाष चौक ते चौबे मार्केटपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या ठिकाणाहून वाहन काढताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. अमृतचे आणि त्यानंतर भुयारी गटारींच्या खोदकामामुळे या रस्त्यांची अधिकच दुरवस्था झाली आहे.
चौबे मार्केटच्या सुरुवातीपासूनच रस्त्याची दुरवस्था
चौबे मार्केटकडून सुभाष चौकाकडे येताना या रस्त्याच्या सुरुवातीला खड्डे दिसून येतात. रस्त्याच्या मधोमध करण्यात आलेल्या खोदकामामुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खोदकामानंतर हा रस्ता व्यवस्थित दुरुस्ती न करता, तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. परिणामी यामुळे संपूर्ण रस्ता खालीवर झाला आहे. विशेष म्हणजे खड्ड्यांच्या जागी मुरूम न टाकता, काही ठिकाणी माती टाकल्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे वाहतूक संथ गतीने होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी दगड-गोटे वर आल्यामुळे वाहनधारकांची अधिकच गैरसोय होत आहे.
खड्ड्यांसह अतिक्रमणाचाही त्रास
चौबे मार्केट ते बेंडाळे चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खड्ड्यांची ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, या ठिकाणी लहान व मोठे मिळून ३५ खड्डे दिसून आले. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्याही उखडलेल्या दिसून आल्या. यामुळे वाहनधारकांची कसरत होत असताना, दुसरीकडे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारच्या विक्रेत्यांनी हातगाड्या उभ्या करून अतिक्रमण केल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन काढण्यासही जागा राहत नसून, किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे मनपा प्रशासनाने लक्ष देऊन, रस्त्यांच्या दुरुस्तीसह अतिक्रमणही हटविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.