लेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान १ ते १६ डिसेंबर दरम्यान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. यात क्षयरोगाचे ३६ नवे रुग्ण समोर आले आहेत. या रुग्णांना तातडीने औषधोपचार सुरू केले आहे. ७ डिसेंबरपर्यंत १४ लाख ३९ हजार लोकांची तपासणी केलेली आहे.
जिल्ह्यातील ३३ लाख ३७ हजार २९२ लोकसंख्येचे सर्वेक्षण करणार असून यासाठी एकूण २९७२ पथके व पर्यवेक्षणासाठी ६३० पर्यवेक्षक यांची निवड केली आहे. १६ डिसेंबर पर्यंत घरोघरी तपासणी होणार असून संकलीत केलेल्या नमुन्यांची आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शासकीय वैदयकीय महाविद्यालयात तपासणी हाेत असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जयवंत मोरे यांनी सांगितले. दरम्यान, शरीरावरील बधीर चट्टे व लालसर चकाकणारी त्वचा व जाड कानाच्या पाळ्या, हातपायावरील सुन्नपणा व बधिरता व शारीरीक विकृती यांची तपासणीही या माेहिमेत होत आहे.
नमुने घेणार एक्सरेही काढणार
निवडण्यात आलेली पथके ही घरोघरी जावून खोकल्याच्या रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळा तंज्ञाकडे पाठवून निदान करण्यात येत आहे. यात रुग्णांचे एक्सरेही केले जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कोरोना तपासणीही सुरू असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.