जळगाव : शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कारासाठी बुधवारी विद्यानिकेतन विद्यालयात निवड समितीकडून ३७ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ त्यामुळे सकाळपासून शिक्षकांनी विद्यालयात गर्दी केली होती़दरवर्षी, शिक्षक पुरस्कारसाठी शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षकांच्या मुलाखती घेऊन निवड केली जाते़ नंतर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत असते़ यंदाही प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड करण्यासाठी बुधवारी विद्यानिकेतन विद्यालयात शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ सकाळी १० वाजता मुलाखतींना सुरूवात झाली़ यावेळी जिल्हाभरातून ३७ शिक्षक मुलाखतीसाठी आले होते़ जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ बी़ एऩ पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़जे़पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी़ एम़ देवांग, शिक्षण सभापती पोपट भोळे या निवड समितीने शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या़ याप्रसंगी प्रभाकर सोनवणे व विद्यानिकेतनचे प्राचार्य पवन पवार यांची उपस्थिती होती़ तसेच दुपारी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या़दरम्यान, निवड समितीकडून निवड करण्यात आलेल्या शिक्षकांची यादी विभागीय आयुक्तांकडून मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे़ त्यानंतर ती यादी जाहीर करण्यात येईल व निवड झालेल्या शिक्षकांना शिक्षक दिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़
३७ शिक्षकांनी दिल्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:52 PM