जळगाव : आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन, जन मानवता फाउंडेशन, चोपडा, साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखुमुक्त शाळा अभियान राबवित आहे. त्यात जिल्ह्यातील ३९२ शाळांना तंबाखुमुक्त घोषित करण्यात आले.
जिल्ह्यात ३ हजार २८५ शाळा आहेत. त्यातील ६७७ शाळांनी सलाम मुंबई फाउंडेशन ॲपवर नोंदणी केली. त्यातील या ३९२ शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. त्यात पारोळा आणि भडगाव हे तालुके आघाडीवर आहेत.
नवीन निकषानुसार शाळा तंबाखुमुक्त करण्याच्या उपक्रमास जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात करण्यात आली आणि ३ महिन्यात शाळांनी विशेष कामगिरी केली. याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संपदा गोस्वामी, जिल्हा तंबाखु नियंत्रण सल्लागार डॉ. नितिन भारती, सलाम मुंबई फाउंडेशनचे संजय ठानगे, जयेश माळी यांचे सहकार्य लाभले.
यावर्षी जळगाव जिल्ह्यास जागतिक स्तरावर तंबाखुमुक्त शाळेचा मान मिळावा, यासाठी जोमने काम करणार असल्याचे जिल्हा तंबाखु नियंत्रण सल्लागार डॉ. नितिन भारती यांनी म्हटले आहे.