सुनील पाटीलजळगाव : सरकारी असो की खासगी क्षेत्र,आज प्रत्येक ठिकाणी महिला या पुरुषांच्या बरोबरीने किं बहुना त्याही पेक्षा पुढे गेल्या आहेत. पोलीस दलात काम करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी सहकारी महिलांच्या मदतीने पुरुषालाही लाजवेल असे काम करुन या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. केंद्र सरकारच्या आॅपरेशन मुस्कान मोहीमेंतर्गत हरविलेल्या २२० मुलांचा शोध घेऊन त्यातील १७१ बालकांना पालकांच्या कुशीत तर ज्यांना पालक नाहीत, अशा ४९ बालकांना बालनिरीक्षणगृहात आसरा दिला आहे.केंद्र सरकारतर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्यात हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात या वर्षात एकाच महिन्यात हरविलेली २२० मुले सापडली.ज्या जिल्ह्यात सर्वाधिक मुले सापडली तेथे या महिन्यात परत ही मोहीम राबविली जात आहे. महाराष्टÑात जळगाव, अहमदनगर व सांगली या तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. यंदा सापडलेल्या बालकांमध्ये १२२ मुले व ९८ मुली आहेत. दरम्यान, नीता कायटे यांच्याकडे एएचटीयु विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. १८ वर्षाच्या आत वयातील हरविलेल्या मुलांबाबत आता थेट अपहरणाचा गुन्हा दाखल होत आहे. संबंधित पोलीस ठाण्याकडून चार महिन्यात हा गुन्हा उघड झाला नाही, तर तो गुन्हा एएचटीयुकडे वर्ग होतो.आणखी २२९ दाम्पत्यांचा संसाराची गाडी रुळावर आणणारसंसारात विघ्न आलेल्या १८८ प्रकरणात तडजोड पती-पत्नी, सासू-सासरे यांच्यातील कौटुंबिक कलह किंवा गैरसमजुतीतून एकमेकांपासून दुरावलेल्या १८८ दाम्पत्याची संसारवेल पुन्हा बहरण्यात नीता कायटे व सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ३८७ दाम्पत्य तारखेवर हजर न राहिल्याने त्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अद्यापही २२९ दाम्पत्यांचा संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी या कक्षाकडून प्रयत्न केले जात आहे. सहायक फौजदार अन्नपूर्णा बनसोडे, सुमन तायडे, शैला बाविस्कर, सविता परदेशी, वैशाली पाटील व मनिषा पाटील यांची टीम देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम काम करीत आहे. तुटलेला संसार पुन्हा बहरत असल्याने त्याचा आनंद शब्दात सांगता येत नसल्याचे या टीमने बोलून दाखविले.हरविलेल्या बालकांना त्यांच्या पालकांकडे व निराधार असलेल्या बालकांना निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. सज्ञान होईपर्यंत या बालकांची काळजी तेथे घेतली जाते. गुन्ह्यांच्या तपासापेक्षा या कामाचे अधिक समाधान लाभते.-नीता कायटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, महिला सहाय्यता कक्ष
हरविलेली १७१ बालके पालकांच्या कुशीत, १८८ दाम्पत्यात बहरली संसारवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:21 PM