जळगाव : जिल्ह्यातील महात्मा फुले कर्जमाफी योजनेपासून वंचित असलेल्या ७८३ शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफ केले असून ४ कोटी १७ लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना झाला आहे. यासंदर्भाचे सहकार विभागाचे आदेश जिल्हा बँकेला बुधवारी दुपारी प्राप्त झाले. सर्वाधिक ६७७ शेतकरी जामनेर तालुक्यातील असून त्याखालोखाल ७० शेतकरी चाळीसगाव तालुक्यातील आहेत. धरणगाव तालुक्यातील अवघ्या एका शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्ज माफी देण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत कापूस, केळी ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता, त्याचा परिणाम म्हणून सर्वाधिक ६७७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील जळगाव तालुक्यातील दोन तर धरणगाव तालुक्याला फक्त एका शेतकऱ्याला लाभ मिळाला आहे. यावल तालुक्यातही एकाच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव तालुक्यातील ७० शेतकऱ्यांना लाभ मिळाला.
तालुकानिहाय शेतकरी व कर्जमाफीची रक्कम
- तालुका - शेतकरी - कर्जमाफीची रक्कम
- धरणगाव - ०१ - ३१ हजार ७९४
- चोपडा - ०५ - ५ लाख ३ हजार ५७९
- एरंडोल- ०३ - २ लाख ३६ हजार १९८
- चाळीसगाव ७० - ४५ लाख ३८ हजार ९२७
- जामनेर - ६७७ - ३ कोटी ४६ लाख ६४ हजार ३९९
- यावल - ०१ - ३८ हजार २५७
- जळगाव - ०२ - १ लाख ४६ हजार ५७०
- रावेर - ०२ - ७० हजार ६६४
- अमळनेर - ०२ - १ लाख १३९ रुपये
- भुसावळ - ०६ - ४ लाख ५२ हजार ५०७
- बोदवड - ०८ - ४ लाख २५ हजार ४२३
- मुक्ताईनगर ०६ - ५ लाख ३३ हजार ९२१